ऑकलंड
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाचा ‘डकवर्थ-लुईस’ नियमानुसार ५ गडी राखून पराभव केला. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या या पावसान्याने प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. नवोदित वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांच्या घातक माराच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला १८५ धावांत गुंडाळले. त्यानंतर १३२ चेंडूंत १४३ धावांचे सुधारित लक्ष्य भारताने २२.४ षटकांत सहज पूर्ण केले. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या अंशुल कंबोजने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत १० षटकांत २२ धावा देऊन २ बळी घेतले, तर विराट कोहलीने ५१ चेंडूंत ७४ धावांची तुफानी खेळी साकारत भारताच्या विजयाचा पाया रचला.
सामन्याच्या सुरुवातीला हलक्या पावसामुळे नाणेफेकीला १० मिनिटांचा उशीर झाला. ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन भारतीय कर्णधार शुभमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच न्यूझीलंडला मोठे धक्के दिले. ९व्या षटकाच्या आतच अर्शदीपने शॉर्ट चेंडूंचा सुरेख वापर करत विल यंग आणि हेन्री निकोल्स या दोघांना बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ दबावाखाली आला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात ८२ धावा देऊन एकही बळी न मिळालेल्या कंबोजने या सामन्यात कमालीचे पुनरागमन केले. ईडन पार्कच्या उसळत्या खेळपट्टीवर त्याने अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. टिम सेफर्टविरुद्ध त्याने सलग ६ निर्धाव चेंडू फेकत षटक निर्धाव काढले. कंबोजने पहिल्या ४ षटकांत अवघ्या ८ धावा दिल्या. त्याने आपल्या १० षटकांत तब्बल ८६.६ टक्के चेंडू ‘लेंथ’ आणि ‘बॅक ऑफ द लेंथ’ टाकले. मिचेल सँटनरला त्रिफळाचित करत आणि नॅथन स्मिथला स्लीपमध्ये विराट कोहलीकरवी झेलबाद करत त्याने न्यूझीलंडची अवस्था ७ बाद ११५ अशी केली.
कंबोजने निर्माण केलेल्या दबावाचा फायदा दुसऱ्या टोकाने गोलंदाजी करणाऱ्या गुरनूर ब्रारला मिळाला. आपल्या उंच पुराचा फायदा घेत ब्रारने अतिरिक्त उसळी प्राप्त केली. १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने टिम सेफर्टला (३८ धावा) बाद केले. त्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजीवर टॉम लॅथमचा जबरदस्त झेल टिपून त्याने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला.
कंबोज आणि ब्रार या नवोदित जोडगोळीने मिळून १९.२ षटके फेकत अवघ्या ६६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी मिळवले. या कामगिरीमुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताला वेगवान गोलंदाजीचे उत्तम पर्याय मिळाले आहेत.
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यात ताळमेळ बिघडल्याने रोहित शर्माच्या थेट फेकीवर मिचेल धावबाद झाला. ग्लेन फिलिप्सने ५१ चेंडूंत ३० धावा करत थोडा प्रतिकार केला, पण अर्शदीप सिंगने त्याला बाद केले.
न्यूझीलंडची अवस्था ८ बाद १३५ अशी झाली होती. परंतु, १०व्या क्रमांकावरील ब्लेअर टिकनरने तळाला येत फटकेबाजी केली. टिकनरने आपल्या खेळीत ४ षटकार मारले. ही १० व्या क्रमांकावरील फलंदाजाने एका एकदिवसीय सामन्यात मारलेल्या सर्वाधिक षटकारांची बरोबरी आहे. टिकनर (३४ धावा) आणि जेकब डफी यांच्यात १० व्या बळीसाठी ३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ ४०.२ षटकांत १८५ धावांपर्यंत पोहोचू शकला. भारताकडून अर्शदीप सिंगने ७० धावांत ४ बळी, गुरनूर ब्रारने ४४ धावांत ३ बळी आणि अंशुल कंबोजने २२ धावांत २ बळी घेतले.
१८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकांत काईल जेमिसनच्या चेंडूवर रोहित शर्मा शून्यावर बाद झाला.
त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही सुरुवातीला सुरेख मारा केला. ११ व्या षटकांत ५५/१ अशी स्थिती असताना मुसळधार पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर काही वेळाने खेळ सुरू झाला, पण वातावरणातील अंधार आणि चेंडू स्पष्ट न दिसल्यामुळे गिलने मैदानावरील पंच पॉल रायफेल यांच्याकडे तक्रार केली.
पुन्हा सामना थांबवण्यात आला आणि अखेर पंचांनी डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला ३२ षटकांत १४३ धावांचे नवे लक्ष्य दिले.
पावसाच्या विश्रांतीनंतर मैदानवर परतलेल्या विराट कोहलीने आपली लय पूर्णपणे बदलली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सातत्याने टाकलेल्या शॉर्ट पिच चेंडूंचा विराटने पुरेपूर फायदा घेतला. विराटने काईल जेमिसनला फाइन लेगला पुल करत चौकार मारला आणि ब्लेअर टिकनरला मिडविकेटच्या वरून षटकार खेचला. त्याने अवघ्या ३५ चेंडूंत आपले ८० वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. परदेशी भूमीवरील हे त्याचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले.दुसऱ्या बाजूने कर्णधार शुभमन गिलने सावध भूमिका घेत विराटला उत्तम साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या बळीसाठी ११३ धावांची शतकी भागीदारी रचली.
विराटने आपल्या ७४ धावांच्या खेळीत ५१ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि १ षटकार लगावला. ईडन पार्कच्या उसळत्या खेळपट्टीवर जिथे इतर फलंदाजांना धावा काढणे कठीण जात होते, तिथे विराटने ‘बॅक ऑफ द लेंथ’ चेंडूंवर २५ चेंडूंत ४३ धावा कुटल्या.
विजय नजरेच्या टप्प्यात असताना न्यूझीलंडच्या जेकब डफीने अचानक सामन्यात नाट्य निर्माण केले:
शुभमन गिल नॅथन स्मिथकडे झेल देऊन बाद झाला. पुढच्याच षटकात विराट कोहली डफीचा शॉर्ट चेंडू मारण्याच्या प्रयत्नात डीप स्क्वेअर लेगला झेलबाद झाला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेल शून्यावर बाद झाला; बॅकवर्ड पॉईंटला ग्लेन फिलिप्सने त्याचा हवेत डायव्ह मारून एका हाताने अदभूत झेल टिपला. अवघ्या ११ चेंडूंत १० धावांच्या आत भारताने ३ बळी गमावले. मात्र, डीएलएस पार धावसंख्येपेक्षा भारत तब्बल ४५ धावांनी पुढे असल्यामुळे भारतावर कोणताही दबाव आला नाही. अखेर श्रेयस अय्यरने (१५ धावा) एक षटकार मारला आणि नवोदित नमन धीरने चौकार ठोकून २२.४ षटकांत भारताला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.
विराटचा विश्वविक्रम
रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. या डावात फलंदाजी करताना १२ धावांचा पल्ला गाठताच त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा पल्ला गाठला आइहे. यासह वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा पल्ला गाठणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटे वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २५४ सामन्यातील २५१ डावांत फलंदाजी करताना ६१ च्या सरासरीने १३ हजार धावा केल्या आहेत.यासह विराट कोहली हा रिकी पाँटिंगनंतर असा दुसराच फलंदाज आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. हा या मालिकेतील पहिलाच सामना आहे. अजूनही ४ सामने शिल्लक आहेत. या ४ सामन्यांमध्ये विराट आणखी मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली (भारत)- १३०६२ धावा
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)- १२६६२ धावा
कुमार संगकारा (श्रीलंका)- ९७४७ धावा
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)- ७७७४ धावा
केन विलियम्सन ( न्यूझीलंड)- ६५०४ धावा
२ किंवा त्यापेक्षा कमी गडी बाद करून ‘सामनावीर’ ठरलेले खेळाडू
अंशुल कंबोज: २/२२ वि. न्यूझीलंड, ऑकलंड (२०२६)
जसप्रीत बुमराह: २/१९ वि. पाकिस्तान, अहमदाबाद (२०२३)
जसप्रीत बुमराह: २/२८ वि. दक्षिण आफ्रिका, द ओव्हल (२०१७)
मोहित शर्मा: २/२६ वि. झिम्बाब्वे, बुलावायो (२०१३)
भुवनेश्वर कुमार: २/१९ वि. पाकिस्तान, एजबॅस्टन (२०१३)
अनिल कुंबळे: २/२२ वि. केनिया, नैरोबी (२०००)
जवागल श्रीनाथ: २/२२ वि. न्यूझीलंड, मुंबई बीएस (१९९५)
अनिल कुंबळे: २/२९ वि. इंग्लंड, लीड्स (१९९०)
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली: १९७१ धावा
रिकी पाँटिंग: १९७१ धावा
सचिन तेंडुलकर: १७५० धावा
कुमार संगकारा: १५६८ धावा
सनथ जयसूर्या: १५१९ धावा
जॅक कॅलिस: १४४९ धावा


