दहा वर्षे पूर्ण केलेले कंत्राटी कर्मचारी होणार नियमित

सरकारच्या विविध खात्यांमध्ये सलग १० वर्षे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी आता सेवेत कायम होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक कार्मिक खात्याने जारी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचे आदेश काढले जातील.


just now
दहा वर्षे पूर्ण केलेले कंत्राटी कर्मचारी होणार नियमित

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
सरकारच्या विविध खात्यांमध्ये सलग १० वर्षे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी आता सेवेत कायम होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक कार्मिक खात्याने जारी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचे आदेश काढले जातील.
विविध खात्यांमधील सुमारे एक हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये संग्रहालय, वीज, कौशल्य विकास, कृषी, नगरनियोजन, पर्यटन, अभियांत्रिकी महाविद्यालय, सरकारी तंत्रनिकेतने, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान (आयटी), सामान्य प्रशासन, आरोग्य आणि क्रीडा या खात्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वीज, आरोग्य आणि शिक्षण खात्यांत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यातील काही कर्मचारी सलग ५ वर्षे, तर काही १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सेवेत आहेत. मात्र, ज्यांनी १० वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनाच या आदेशाचा लाभ मिळेल.
याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सेवेत कायम करण्याचे नियम निश्चित करून सप्टेंबरमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता प्रत्यक्ष आदेश जारी करण्याचे परिपत्रक आणि त्यासोबत आदेशाचा नमुनाही सर्व विभागांना पाठवण्यात आला आहे. मात्र, किमान शैक्षणिक पात्रता आणि कमाल वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत कायम केले जाईल. त्यामुळे सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेलच असे नाही.

कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता विचारात घेऊन ही प्रक्रिया राबवली जाईल आणि ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. परंतु, सेवाज्येष्ठतेच्या यादीत हे कर्मचारी सध्या कायम असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाली राहतील.
सेवेत कायम होण्यासाठीच्या प्रमुख अटी
कर्मचाऱ्याची भरती नियमांनुसार झालेली असावी.
कर्मचाऱ्याची सेवा कोणत्याही न्यायालयीन आदेशावर अवलंबून नसावी.
सेवेतील वर्तणूक समाधानकारक असावी.
कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही खातेनिहाय किंवा इतर चौकशी सुरू नसावी.
संबंधित खात्यातील रिक्त पदांवरच या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.
मंजूर पदांपेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास, अतिरिक्त पदे निर्माण झाल्याचे गृहीत धरले जाईल.

कंत्राटी भरतीवर भविष्यात बंदी
यापुढे सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ तज्ज्ञ, सल्लागार किंवा विशिष्ट प्रकल्प आणि कामांसाठीच कंत्राटी नियुक्ती करण्याची मुभा असेल.
नोकरभरतीला वेग
निवडणूक जवळ आल्याने राज्यात नोकरभरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. कर्मचारी भरती आयोगाने यापूर्वीच एलडीसी, पोलीस शिपाई, आरएफओ आणि लॅबोरेटरी असिस्टंट या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, संगणक आधारित चाचणी (सीबीटी) आणि शारीरिक चाचणीची (पीईटी) प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर खात्यांत कंत्राटी भरतीच्या जाहिरातीही निघत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा