‘बर्च’ दुर्घटनाप्रकरणी कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये जमा

आग दुर्घटनेत २५ जणांचा झाला होता मृत्यू

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
just now
‘बर्च’ दुर्घटनाप्रकरणी कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये जमा

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या भीषण आग दुर्घटनेतील २५ मृतांच्या कुटुंबीयांना ७ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकी २० लाख रुपयांची अंतरिम नुकसानभरपाई देण्याचा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार, कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन प्रथम अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची आणि नंतर अॅड. तेरेन्स सिक्वेरा यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, न्यायालयाने दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी यावर भर दिला होता. त्यानुसार, क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि व्यावसायिक भागीदार अजय गुप्ता यांनी मृत्यू पावलेल्या २५ जणांना १५ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला होता. मागील सुनावणीत दुर्घटनेतील मृतांच्या कुंटुबियांतर्फे अॅड. प्राची सावंत यांनी प्रस्तावाबाबत कुटुंबीयांशी चर्चा केली होती. त्यात सदर रक्कम कमी अाहे. त्यांनी किमान ५० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती केली. याची माहिती न्यायालयात दिल्यानंतर २० लाख रुपयांची अंतरिम नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने कंपनीला भीषण आग दुर्घटनेतील २५ मृतांच्या कुटुंबियांना ७ फेब्रुवारी २०२७ रोजी पर्यंत प्रत्येकी २० लाख रुपयांची अंतरिम नुकसानभरपाई देण्याचा निर्देश जारी केला. तसेच सदर रक्कम तीन टप्प्यात न्यायालयात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, ५ लाख रुपये १६ नोव्हेंबर पूर्वी, त्यानंतर ५ लाख रुपये ७ डिसेंबर पूर्वी आणि राहिलेले १० लाख रुपये ७ फेब्रुवारी पूर्वी जमा करण्यास सांगितले होते.

पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी

बुधवार २५ रोजी न्यायालयात सुनावणी झाली असता, १६ नोव्हेंबर रोजी दुर्घटनेतील २५ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता न्यायालयात जमा केला आहे, अशी माहिती कंपनीने उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होणार आहे. 

हेही वाचा
सर्व पहा