प्रवीण आर्लेकर मित्र असले तरी पक्षाचा निर्णयच अंतिम : आरोलकर

वैयक्तिक उमेदवाराला पाठिंबा नसून युतीच्या निर्णयासोबतच राहणार असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी स्पष्ट केले. राजन कोरगावकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अफवा असल्याचे सांगत प्रवीण आर्लेकर मित्र असले तरी पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असे ते म्हणाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
20 mins ago
प्रवीण आर्लेकर मित्र असले तरी पक्षाचा निर्णयच अंतिम : आरोलकर

पणजी : मांद्रे आणि पेडणे परिसरातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आमदार जीत आरोलकर यांनी सविस्तर भाष्य करत यातील अनेक गोष्टी निव्वळ अफवा आणि गैरसमज असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार असून, पक्षाची भूमिका आणि युतीच्या निर्णयानुसारच पुढील पावले उचलणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या चर्चांमुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी आपली भूमिका मांडली.



राजन कोरगावकर यांना छुप्या पद्धतीने पाठिंबा देत असल्याच्या किंवा त्यांच्या भाजप प्रवेशात हात असल्याच्या चर्चांबाबत बोलताना आरोलकर यांनी या केवळ गॉसिपिंगचा भाग असल्याचे नमूद केले. आपण मगोचे आमदार असल्याने केवळ स्वतःच्या पक्षाबद्दलच बोलू शकतो, असे सांगत दुसऱ्या पक्षातील घडामोडींवर भाष्य करणे किंवा तेथे कोण प्रवेश करणार, याचा निर्णय घेणे आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीसाठी मगो पक्षाची उमेदवारी पक्षाच्या अध्यक्षांनी दिपोत्सवाच्या काळातच स्पष्ट केल्याचे सांगत, आपण मगो पक्षातच कार्यरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राजन कोरगावकर हे सध्या मगोच्या बॅनरखाली काम करत असल्याचे दिसत असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत आपण काहीही सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप हा मोठा राष्ट्रीय पक्ष असून, त्यांच्याकडे अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि निर्णय घेणारी समिती आहे; त्यामुळे उमेदवारी आणि पाठिंब्याबाबतचा निर्णय संबंधित पक्षच घेईल, असे आरोलकर यांनी सांगितले. आपला पाठिंबा कोणत्याही एका व्यक्तीला नसून युतीला असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मगो आणि भाजपच्या युतीमध्ये पुढे जे ठरेल आणि ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल, त्यालाच पाठिंबा दिला जाईल. एखाद्या वैयक्तिक उमेदवाराला पाठिंबा असेल, असे आपण कधीही म्हटलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले. युतीचा धर्म पाळून दोन्ही पक्षांचे अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, त्यानुसार परस्परांना सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रवीण आर्लेकर यांच्याशी असलेल्या मैत्रीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते आपले मित्र असले तरी सध्या विद्यमान आमदार असून, पक्षाच्या निर्णयानुसार पुढील बाबी ठरतील, असे आरोलकर म्हणाले. विधानसभेत सहकारी म्हणून काम करत असले, तरी अंतिम निर्णय पक्ष आणि युतीच्या माध्यमातूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा
सर्व पहा