पत्रकारांना माहिती देताना सुभाष वेलिंगकर. सोबत गो. रा. ढवळीकर व इतर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे ४ डिसेंबरपर्यंत राज्यात १ हजार ठिकाणी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या यात्रेची सुरुवात होत आहे. यात्रेदरम्यान १४ रथ ठीकठिकाणी मराठी राजभाषेबाबत जागृती करणार आहेत. ६ डिसेंबर रोजी म्हापसा येथे बोडगेश्वर मंदिर प्रांगणात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुभाष वेलिंगकर यांनी दिली. शुक्रवारी येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गो. रा. ढवळीकर, श्रीगणेश गावडे व पदाधिकारी उपस्थित होते.
वेलिंगकर यांनी सांगितले की, माऊली मराठी जागर यात्रेच्या रथामध्ये विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांची प्रतिमा आणि भगवा ध्वज असणार आहे. या मूर्ती आणि प्रतिमा पंढरपूर आणि आळंदी येथून आशीर्वाद घेऊन आणल्या आहेत. हे रथ गावोगावी फिरणार आहेत. यावेळी भाविकांना रथांचे पूजन करण्याची संधी दिली जाईल. रथासोबत ५०० कार्यकर्ते असणार आहेत.
म्हापशातील विराट सभेत घेणार मोठा निर्णय
वेलिंगकर म्हणाले, ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिर परिसरात विराट ‘मराठी भक्ती संगम’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये मोठा निर्णय घेतला जाणार आहे. सरकारने येत्या अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती करून मराठीला राजभाषेचा दर्जा देणे आवश्यक आहे. असे न केल्यास विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील. मराठीला राजभाषा करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत २.५ लाख सह्या गोळा झाल्या आहेत.


