फोंडा : उसगाव येथील नेसले कंपनी जवळील रस्त्यावर शुक्रवारी पहाटे डुक्स मोटारसायकलची धडक रस्त्यावर असलेल्या म्हशीला बसली. अपघातात म्हशीचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला पणजी येथील खासगी इस्पीतळात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार बंगळुरूहून वागातोर येथे जाणाऱ्या दुचाकीची धडक रस्त्यावर असलेल्या म्हशीला बसली. अपघात शुक्रवारी पहाटे घडला. स्थानिकांनी त्वरित जखमी युवकाला पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण जखमी झालेल्या युवकाबरोबर असलेल्या अन्य दुचाकीस्वार युवकांनी जखमीला खासगी इस्पीतळात दाखल केले.
परिसरात यापूर्वी अनेक अपघात गुरांमुळे घडले आहेत. अपघातात यापूर्वी कित्येक गुरे दगावली आहेत. त्याचबरोबर काही जणांचा बळी तर काही दुचाकी चालक गंभीर जखमी होण्याचे प्रकार परिसरात वारंवार घडत असतात; अशी माहिती या रस्त्यावरून नियमित वाहने घेऊन जात असलेल्यांनी दिली.


