वास्को : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिल्याचा मुद्दा वास्को येथे उपस्थित झाला आहे. पॅन कार्ड स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बूथ पातळीवरील अधिकाऱ्याला (बीएलओ) काँग्रेस नेते नंदादीप राऊत यांनी जाब विचारत या प्रकाराचा तीव्र निषेध केला.
मतदार यादीतून वगळले गेलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करताना संबंधित बीएलओने पॅन कार्ड स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप राऊत यांनी केला. यामुळे संबंधित नागरिकांना मतदानाच्या लोकशाही अधिकारापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी राऊत यांनी मामलेदारांची भेट घेतली. सर्व बीएलओंना आवश्यक कागदपत्रांच्या स्वीकृतीबाबत स्पष्ट सूचना देणारे परिपत्रक जारी करण्याचे आश्वासन मामलेदारांनी दिल्याचे राऊत यांनी सांगितले.
वारंवार प्रयत्न करूनही नागरिकांची नावे मतदार यादीत पुन्हा समाविष्ट झाली नाहीत, तर या प्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला. राजकीय हस्तक्षेपामुळे कोणत्याही नागरिकाचा मतदानाचा लोकशाही अधिकार हिरावला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.


