करवीर मठातील ऐतिहासिक पोर्तुगीज दस्तऐवजांचे होणार डिजिटायझेशन

पुराभिलेख खाते, संकेश्वर करवीर पीठ यांच्यात करार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th November, 10:22 pm
करवीर मठातील ऐतिहासिक पोर्तुगीज दस्तऐवजांचे होणार डिजिटायझेशन

पोर्तुगीज राजवटीत विसाव्या शतकात झालेली शुद्धीकरणाची प्रक्रिया तसेच त्या काळातील सामाजिक व राजकीय इतिहासाचे संदर्भ असलेली हस्तलिखिते आणि इतर दस्तऐवज करवीर मठात उपलब्ध आहेत. या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करून ते पुराभिलेख खात्यात उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी पुराभिलेख खाते आणि संकेश्वर करवीर पीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. हे दस्तऐवज संशोधन आणि अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बंगल्यावर आयोजित कार्यक्रमात करवीर मठाचे शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामी आणि शंकर भारती स्वामी उपस्थित होते.

पुराभिलेख खात्याचे अधिकारी संकेश्वर करवीर मठाला भेट देऊन तेथील शुद्धीकरणासंदर्भातील हस्तलिखिते आणि दस्तऐवजांची पाहणी करतील. गोव्याशी संबंधित पोर्तुगीजांनी केलेला पत्रव्यवहार व अनेक कागदपत्रे या मठात उपलब्ध असून, मठातच त्यांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे.

दस्तऐवजांचे दोन संच तयार होणार

डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर या दस्तऐवजांच्या प्रतींचा एक संच करवीर मठात ठेवला जाईल, तर दुसरा संच पुराभिलेख खात्यात आणला जाईल. डिजिटायझेशनच्या या कामासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती पुराभिलेख खात्याचे संचालक बालाजी शेणॉय यांनी दिली.

हस्तलिखिते आणि वारशाचे जतन करून ज्ञानाचे संवर्धन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने गोव्याची वाटचाल सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा