घर बांधणी, खरेदी तसेच दुरुस्तीसाठी गोवा सरकारची 'हाऊसिंग फॉर ऑल' योजना

गोवा सरकारने ‘हाऊसिंग फॉर ऑल’ उपक्रमांतर्गत गृहकर्ज योजना पुन्हा सुरू केली असून, पात्र नागरिक, पत्रकार आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ४ टक्के व्याजसवलत मिळणार आहे. तसेच घरदुरुस्ती कर्जाची मर्यादा ५ लाख रुपये केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 hours ago
घर बांधणी, खरेदी तसेच दुरुस्तीसाठी गोवा सरकारची 'हाऊसिंग फॉर ऑल' योजना

पणजी : ‘हाऊसिंग फॉर ऑल’ या संकल्पनेअंतर्गत गोवा सरकारने गृहकर्ज तसेच घरदुरुस्ती योजनांना अधिक गती दिली असून, विविध घटकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा सरकारने गृहकर्ज योजना पुन्हा सुरू केली असून, गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना गृहकर्ज देण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय खासगी क्षेत्रात काम करणारे नागरिक, खासगी उद्योगातील घटक तसेच पत्रकार बांधवांनाही या गृहकर्ज योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

खासगी क्षेत्र, उद्योग आणि प्रेस व मीडियातील नागरिकांना खासगी गृहकर्जाच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. सरकारच्या सूचीबद्ध म्हणजेच एम्पॅनेल्ड बँकांद्वारे पात्र अर्जदारांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल आणि त्यावरील ४ टक्के व्याजदर गोवा सरकारकडून भरले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे गोव्यातील १५ वर्षांचे वास्तव्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील, तसेच गृहकर्ज योजनेच्या इतर पात्रता निकषांची पूर्तता करावी लागेल. कोणत्याही बँकेत अर्ज करून कर्ज घेतल्यास, त्यावरील ४ टक्के व्याजाचा लाभ संबंधित पात्र नागरिकांना आणि पत्रकारांना मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हाऊसिंग फॉर ऑल’ या संकल्पनेनुसार गोव्यात ही योजना राबवली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. एका बाजूला गृहकर्ज उपलब्ध करून दिले जात असून, दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, त्यांना घरे देण्याचे कामही सुरू आहे. आदिवासी कल्याण योजनेअंतर्गत तसेच समाज कल्याण विभागांतर्गत ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरदुरुस्ती कर्जाची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय घरदुरुस्ती योजनेव्यतिरिक्त इतर विविध योजनांच्या माध्यमातूनही आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी आणि घरदुरुस्तीसाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा