पणजी : सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) व्याप्ती केवळ चित्रपट पडद्यापुरती मर्यादित न राहता त्यापलीकडे विस्तारली आहे. इफ्फी परिसर सर्जनशील संस्था, सांस्कृतिक उपक्रम, प्रादेशिक खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, विविध वस्तू आणि सुलभता उपक्रमांचे एक केंद्र बनले आहे. या विविध गोष्टींमुळे प्रतिनिधी, चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि अभ्यागतांना भारताच्या समृद्ध सर्जनशील आणि सांस्कृतिक विश्वाचा शोध घेण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचे माहिती आणि प्रसारण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या परिसरात 'स्वयम' ही संस्था जनजागृती उपक्रम राबवत आहे. ही संस्था शारीरिकदृष्ट्या मर्यादित हालचाल असलेल्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्यांच्यासाठी सर्वत्र प्रवेश सुलभ असावा, यासाठी काम करते. सार्वजनिक जागा सर्वांसाठी सुलभ असण्याची गरज आणि सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या सहभागावर ही संस्था भर देत आहे. महोत्सवाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुलभताविषयक सोयीसुविधांना हा उपक्रम पूरक ठरत असून, सांस्कृतिक अनुभव सर्वांसाठी सुलभ आणि स्वागतार्ह बनवण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे.

महोत्सवाचा परिसर सर्जनशील तंत्रज्ञान, चित्रपट, कला आणि डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसाठी एक व्यासपीठ ठरत आहे. येथे 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज' या संस्थेद्वारे ॲनिमेशन कॅरेक्टर-मेकिंग स्पर्धा घेतली जात आहे. संस्थेकडील विविध उत्पादनांचे प्रदर्शन तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी आणि भविष्यातील शक्यतांची ओळख करून देत आहे. केंद्राच्या प्रकाशन खात्यातर्फे येथे पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याशिवाय माध्यम, मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांमध्ये योगदान देणाऱ्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक संस्थाही या उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या आहेत.


