आयुष्य समजले की अभिनय देखील समजतो : मुकेश छाब्रा

नवोदित कलाकारांनी पात्राची आर्थिक व भावनिक स्थिती समजून अभिनय करावा, नकाराने खचून जाऊ नये आणि प्रामाणिकपणे तयारी सुरू ठेवावी, असे प्रतिपादन कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी इफ्फीच्या मास्टरक्लास दरम्यान केले.

Story: पिनाक कल्लोळी | गोवन वार्ता |
5 hours ago
आयुष्य समजले की अभिनय देखील समजतो : मुकेश छाब्रा

पणजी : चित्रपटासाठी ऑडिशनला गेल्यावर अभिनेत्यांनी त्या पात्राची आर्थिक, सामाजिक स्थिती, त्याची भाषा आणि भावनिक स्थिती कोणती असेल अशा विविध गोष्टींचा विचार करावा. असा विचार करून अभिनय केल्यास तो अधिक चांगला होतो. अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कलाकारांनी आपले आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचे आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्याला आयुष्य समजले, तर अभिनय देखील समजतो, असे प्रतिपादन कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी केले. गुरुवारी इफ्फीच्या मास्टर क्लास सत्रात ते बोलत होते.

छाब्रा यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी चित्रपटाच्या पात्रांसाठी अभिनेते शोधण्याचे काम खुद्द दिग्दर्शक करत होते. त्यावेळी कास्टिंग डायरेक्टर या संकल्पनेने अजून मूळ धरले नव्हते. मी जेव्हा कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरू केले, तेव्हा काही काळ त्रास झाला. दिग्दर्शक मला भेटण्याची वेळ देत नव्हते. मात्र, मी निराश न होता माझे काम सुरू ठेवले. चित्रपटाच्या आशयानुसार त्यातील पात्रांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेते कोठे मिळतील याचा मी शोध घेतला. देशभरातील विविध नाटके व अन्य कलाप्रकार पाहिले, तेथील कलाकारांशी संवाद साधला आणि योग्य अभिनेते शोधून काढले.

आज देखील माझी ही प्रक्रिया सुरूच आहे. चित्रपटाची कथा राजस्थानमधील असेल, तर मी राजस्थानच्या गावात जाऊन तेथील अभिनेते शोधतो. आज माझ्या मुंबईतील कार्यालयात ऑडिशनसाठी दिवसाला आठ ते दहा हजार कलाकार येतात. 'गँग्स ऑफ वासेपूर', 'दंगल', 'धुरंधर', 'रामायण' यांसारख्या चित्रपटांसाठी कास्टिंग करणे मला थोडे अवघड गेले. आपल्या देशाएवढे टॅलेंट अन्य कोठेही मिळू शकणार नाही. ऑडिशनला जाणाऱ्या कलाकारांनी प्रामाणिक राहावे. निवड झाली नाही, तर हार न मानता आपली तयारी सुरू ठेवली पाहिजे. नकार मिळणे हा आयुष्यातील एक भाग आहे, हे समजून घेतले पाहिजे.

स्टारकिड्सना देखील नकार दिला

छाब्रा यांनी सांगितले की, माझ्यासाठी ऑडिशनला आलेल्या कलाकाराचा अभिनय महत्त्वाचा असतो. याआधी मी अभिनय करता न येणाऱ्या सिनेतारकांच्या मुलांना देखील कास्टिंग करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा