पणजी : घर नसलेल्या मूळ गोमंतकीयांना मुख्यमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० वर्षांच्या लीजवर फ्लॅट देण्यात येणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना घरासाठी ४ टक्के व्याजाने ३५ लाख रूपर्यांपर्यंत गृहकर्ज देणाऱ्या योजनेलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर उपस्थित होते.
फ्लॅट व घरांच्या किमती वाढत असल्याने गरीब व सामान्य गोमंतकीयाला आता घर बांधणे अशक्य झाले आहे. ज्यांच्याकडे घर नाही व ज्यांना घर बांधणे शक्य नाही, त्यांच्यासाठी फुकट फ्लॅट देण्याची योजना सरकारने आखली आहे. नाममात्र ५ हजार रूपयांच्या शुल्कावर ३० वर्षांच्या लीज करारावर हा फ्लॅट दिला जाईल. फ्लॅट घेऊन तो विकला जाऊ नये, यासाठी लीज करारावर तो दिला जाणार आहे. संबंधित व्यक्ती वा त्याच्या कुटुंबियाकडे घर नसेल तरच तो या योजेनाला पात्र ठरणार आहे.
इतर पात्रता निकष :
वडील किंवा आजोबा गोवा मुक्तीपूर्वी जन्मलेले असणे आवश्यक
वार्षिक ५ लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असलेलेच पात्र
गोव्यात ३० वर्षे वास्तव्य आवश्यक
सरकारकडे सध्या १५० फ्लॅट विनावापर आहेत. तसेच बरेच सरकारी क्वॉटर्सही उपलब्ध आहेत. याशिवाय या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यात फ्लॅट बांधले जातील. त्या तालुक्यातील रहिवाशांना त्याच तालुक्यात फ्लॅट दिले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन गृहकर्ज योजना आखली आहे. ५ वर्षे पूर्ण केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना ४ टक्के व्याजाने घर बांधण्यासाठी ३५ लाख रूपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. हे कर्ज एम्पेनल केलेल्या बँकांमार्फत दिले जाईल. सरकारची सर्व खाती, महामंडळे, स्वायत्त संस्था, पत्रकार तसेच गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ कर्मचाऱ्यांंनाही ही योजना लागू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलें.
मंत्रिमंडळाचे इतर निर्णय
मच्छिमार विज्ञान महाविद्यालयासाठी २० पदांची निर्मिती
आदिवासी कल्याण खात्यासाठी ६ पदांना मान्यता
एससी, एसटी आर्थिक विकास महामंडळासाठी ९ पदांना मान्यता
नशामुक्त युवा उपक्रमाच्या ९८ लाखाच्या खर्चाला मान्यता
एसटी आरक्षणाबाबत सरकार गंभीर
येत्या विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षणाची कार्यवाही करण्याबाबत सरकार गंभीर असून यासाठीच सर्व प्रयत्न सुरू आहेत. उच्च न्यायालयात एसटी आरक्षण याचिकेवर सुनावणी सुरू असून केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. गोवा सरकार उद्या दि. २७ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. सुनावणी लवकर पूर्ण होऊन २४ डिसेंबरपर्यंत निकाल अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. एसटी आरक्षणाच्या कार्यवाहीसाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी भाजपनेच एसटी समाजातील नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘हाऊसिंग फॉर ऑल’ योजना
‘हाऊसिंग फॉर ऑल’ या संकल्पनेअंतर्गत गोवा सरकारने गृहकर्ज तसेच घरदुरुस्ती योजनांना अधिक गती दिली असून, विविध घटकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा सरकारने गृहकर्ज योजना पुन्हा सुरू केली असून, गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना गृहकर्ज देण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय खासगी क्षेत्रात काम करणारे नागरिक, खासगी उद्योगातील घटक तसेच पत्रकार बांधवांनाही या गृहकर्ज योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.


