पणजी : पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली दडलेली, प्राचीन ग्रंथांच्या पानांतून वाहणारी आणि भारताच्या सांस्कृतिक स्मृतीमध्ये रुजलेली सरस्वती नदी देशातील एक कायमचे रहस्य राहिली आहे. प्राचीन परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक शोध यांच्यातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने 'द अनसीन होली रिव्हर – सरस्वती' या माहितीपटाची निर्मिती केली. विस्तृत संशोधनाला संक्षिप्त, आकर्षक आणि मनोरंजक स्वरूपात मांडणे हे एक मोठे आव्हान होते, असे प्रतिपादन माहितीपटाचे दिग्दर्शक भास्कर विश्वनाथन यांनी केले. गुरुवारी इफ्फीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विश्वनाथन यांनी सांगितले की, हा माहितीपट सरस्वती नदीची रंजक कथा आणि डॉ. सुभाष सी. सिंग यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाचा आढावा घेतो. यामध्ये प्राचीन भौगोलिक संदर्भ, भूगर्भीय निरीक्षणे आणि वैज्ञानिक तपासणी यांना एकत्र आणून भारताच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सरस्वती नदीभोवतीचे रहस्य माझ्यासाठीही तितकेच कुतूहलाचे होते. या विषयावर केलेले संशोधन माहितीपटासाठी प्रेरणेचा मोठा स्रोत ठरले. सारस्वत संस्कृती आणि प्राचीन वैदिक परंपरेशी असलेला संबंध तसेच वेदांची रचना याच नदीच्या काठी झाल्याचे मानले जाते.
हे अफाट संशोधन संक्षिप्त, आकर्षक आणि मनोरंजक स्वरूपात मांडणे हे एक मुख्य आव्हान होते. हा माहितीपट संशोधनावर आधारित ठेवूनही तो व्यापक प्रेक्षकांसाठी आकर्षक बनवायचा आम्ही प्रयत्न केल्याचे विश्वनाथन यांनी सांगितले. माहितीपटाचे निर्माते अभिनव जैन म्हणाले की, भारताच्या नद्या आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व याबद्दलच्या कुतूहलातूनच या चित्रपटाची निर्मिती झाली. याआधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीद्वारे आयसोटॉपिक अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये जल नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यामुळे आम्हाला भूमिगत जलजालाशी संबंधित संशोधनाला मोलाची मदत झाली.


