एसटी आरक्षणावर उच्च न्यायालयात ७ डिसेंबरपासून सुनावणी : एजी पांगम

सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ३१ डिसेंबरपूर्वी निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
एसटी आरक्षणावर उच्च न्यायालयात ७ डिसेंबरपासून सुनावणी : एजी पांगम

पणजी : गोव्यातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीसाठी ठोस वेळापत्रक निश्चित केले असून, ७ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे. आज गुरुवारी न्यायालयात झालेल्या घडामोडींनंतर एजी देविदास पांगम यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ३१ डिसेंबरपूर्वी निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हे प्रकरण आधीच अंतिम सुनावणीसाठी ठेवल्याचे नमूद करत, तेथेच युक्तिवाद करून अंतिम निर्णय घेण्याची मागणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. मात्र, अंतिम सुनावणी होईलच याची कोणतीही खात्री नसल्याचे राज्य सरकारतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे निर्देश दिले. त्यानुसार उच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपूर्वी हे प्रकरण कोणत्याही प्रकारे निकाली काढावे आणि सध्याचा अंतरिम आदेश ३१ डिसेंबरपर्यंतच वैध राहील, तसेच तो पुढे वाढवायचा असल्यास उच्च न्यायालयाला स्वतंत्र आदेश पारित करावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय, गोवा सरकार या न्यायालयीन प्रक्रियेत पक्षकार नसल्याची तक्रारही मांडण्यात आली. त्यावर गोवा सरकारला पक्षकार करण्याचे निर्देश देत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत मंजूर करण्यात आली. आज उच्च न्यायालयात हे प्रकरण आले असता सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सादर करण्यात आला. त्यानुसार गोवा सरकार उद्याच प्रतिज्ञापत्र दाखल करणार असून, केंद्र सरकारने आज प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. एसटी समुदायाशी संबंधित इतर खासगी प्रतिवादींना २ तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून, याचिकाकर्त्यांना उत्तरदाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी दिला आहे. ७ तारखेपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचे आणि त्या दिवशी ती तहकूब होऊ नये, असे आदेश देण्यात आल्याने ७ डिसेंबरपासून सुनावणी सुरू होण्याची खात्री असून, आरक्षणाचा हा प्रश्न उच्च न्यायालयातच निकाली निघेल, असे पांगम यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने गोवा विधानसभा एसटी आरक्षणाची अधिसूचना जारी केल्यानंतर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर रोजी कायद्याच्या कलम ३ नुसार एसटी लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास अंतरिम स्थगिती दिली होती.

जुन्या आकडेवारीनुसार अधिसूचना काढणे योग्य नसून, सध्याच्या नवीन आकडेवारीवर आधारित अधिसूचना जारी व्हावी, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले होते. उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाविरोधात गोवा सरकार आणि ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. माजोर्डा येथील एडविन फर्नांडिस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.

या संदर्भात गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता,  केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून योग्य प्रक्रिया करून कायदा केला असल्याने याचिका फेटाळण्याची मागणी केली. या संदर्भात भारताचे उप सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी बाजू मांडली.


हेही वाचा
सर्व पहा