सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी; सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी

४ टक्के गृहकर्ज व कंत्राटी कर्मचारी कायम करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि एलडीसी व एमटीएस कर्मचाऱ्यांनाही वन स्टेप प्रमोशन द्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी; सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी

पणजी : राज्य सरकारने नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांना ४ टक्के दराने ३५ लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांचे आम्ही स्वागत करतो. यामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सरकारने आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी केली. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मांद्रेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले आहे. त्यांनी संघटनेच्या विविध मागण्या पूर्ण केल्या आहेत. यापुढेही ते आम्हाला सहकार्य करतील, अशी खात्री आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे याची आम्हाला माहिती आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्राशी बोलणी करावी. जुनी पेन्शन योजना राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे. ही योजना म्हणजे जणू निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वृद्धापकाळातील काठी आहे. त्यामुळे ती लागू करणे गरजेचे आहे.

ते म्हणाले की, गृहकर्जाची घोषणा केल्याने सर्व सरकारी कर्मचारी आनंदी आहेत. आपले एक छोटेसे घर असावे, असे सरकारी कर्मचाऱ्यांना वाटत असते. या योजनेमुळे ते स्वप्न पूर्ण होणार आहे. याशिवाय आम्ही आमच्या 'डीएसएसवाय' बाबतची प्रलंबित मागणी पूर्ण करण्याची सरकारला विनंती करत आहोत. सरकारने पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना 'वन स्टेप प्रमोशन'ची घोषणा केली आहे. यानुसार एखादा पोलिस कॉन्स्टेबल निवृत्त होत असेल, तर त्याला हेड कॉन्स्टेबलची बढती देऊन त्यानुसार निवृत्तीवेतन दिले जाते. अशाच प्रकारे अन्य खात्यातील एलडीसी आणि एमटीएस कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू करावी.

सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेची सेवा करावी

मांद्रेकर म्हणाले की, एखाद्या-दुसऱ्या सरकारी कर्मचाऱ्याच्या वागणुकीमुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे नाव खराब होत आहे. सरकारी कर्मचारी जनतेची सेवा करण्यासाठी आहेत. त्यांचा उद्देश लोकसेवा करणे हाच असला पाहिजे, हे सर्व कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

हेही वाचा
सर्व पहा