पणजी : वाहन चालकांच्या मोबाईलवर येणारा एक साधा वाटणारा ई-चलन मेसेज कसा मोठा आर्थिक धक्का देऊ शकतो, याचे ताजे उदाहरण गोव्यातील सायबर फसवणुकीच्या प्रकरणातून समोर आले आहे. तुमच्या वाहनासाठी ई-चलन जारी झाल्याचा खोटा संदेश पाठवून तक्रारदाराला जाळ्यात ओढण्यात आले. संदेशातील लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये घातक एपीके फाईल डाऊनलोड झाली आणि त्यानंतर अनधिकृत व्यवहार करत तब्बल १२ लाख ६९ हजार ४४६ रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा सायबर गुन्हे शाखेने वेगवान कारवाई करत बंगळुरू येथून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांचा माग काढत पोलिसांनी बंगळुरूमधील दोघांची ओळख पटवली. पीएसआय नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पीसी सिद्धरामय्या मठ, पीसी आतिश शेटकर आणि पीसी सुनील रेणाती यांच्यासह २५ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील चिक्कबनवरा येथून महबूब के. (२१) आणि सागर कुमार आर. (२२) या दोघांना अटक केली. या गुन्ह्याशी संबंधित ५ लाख ९ हजार ४८३ रुपये २७ पैशांची रक्कम सुरक्षित करण्यात आली असून, योग्य प्रक्रियेनुसार ती तक्रारदाराला परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना गोव्यात आणून मेरशी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोव्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वेदप्रकाश सूर्य सायबर गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक जीवबा दळवी, अपर पोलीस अधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती शोधणे आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याचे जीवबा दळवी यांनी सांगितले. कोणत्याही ई-चलन संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नये, अपरिचित स्रोतावरून एपीके फाईल डाऊनलोड करू नये आणि चलनाची माहिती केवळ अधिकृत माध्यमांवरूनच तपासावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) सह कलम ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.


