गेल्या काही वर्षांत सरकारने कल्याणकारी योजना राबवण्याचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळातील काही ठसा सोडणाऱ्या योजना आल्या; त्यातील ‘माझे घर’ आणि ‘माझा फ्लॅट’ अशा काही योजनांचा उल्लेख करावा लागेल. आता गेल्या दोन दिवसांपासून पूर्वी जाहीर केलेल्या काही योजनांची कार्यवाही सुरू झाली आहे. गोव्याच्या विधानसभेची निवडणूक पुढील दीड महिन्यात जाहीर होणार आहे. तोपर्यंत अनेक नव्या योजना जाहीर होतील. सध्या कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना कायम करण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. सरकारी सेवेत दहा वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हजारो कर्मचारी कंत्राटावर आहेत; मात्र दहा वर्षांपेक्षा जास्त काळ किती कर्मचाऱ्यांनी पूर्ण केला आहे, याची माहिती पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. किमान एक हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. सरकारने आणखी एक योजना जाहीर केली आहे, जी काही वर्षांपूर्वी बंद केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना ३५ लाखांपर्यंतचे गृहकर्ज देण्याची योजना. त्यासाठी चार टक्के व्याज आकारले जाईल. यापूर्वी दोन टक्के व्याजाची योजना होती. ती बंद करून त्या योजनेसाठी बँकांकडे असलेली ठेव रक्कमही सरकारने काढली होती. आता पुन्हा नव्याने योजना आणल्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. निवडणुकीच्या काळात हा दिलासा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. ‘मुख्यमंत्री आवास’ योजनेतून ज्यांच्याकडे घर नाही, अशा गोमंतकीयांना घर देण्याची तरतूद केली आहे. त्यासाठी सरकारी क्वार्टर्स आणि गृहनिर्माण मंडळाकडे पडून असलेले फ्लॅट वापरण्यात येतील. ही योजना जरी चांगली असली, तरी तिच्या निकषांत कोणता गोमंतकीय बसेल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. पण योजनांची खैरात करण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक घटकांना पुढील काही दिवसांत योजनांचे लाभ मिळणार आहेत. सध्या सुरू असलेल्या योजनांचा लाभ वाढवण्यापासून ते नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे, असे दिसते. त्यामुळे पुढील काही दिवस हे निवडणुकीपूर्वीच्या योजनांसाठीचे असतील, यात शंका नाही. कारण दिलेली अनेक आश्वासने निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अंमलात येतील. त्यांचे लाभ भलेही मतदानापूर्वी बँकांमध्ये येतील. पण या निवडणुकीपूर्वीच्या योजनांसह निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्येही योजनांची खैरात असेल. आता इतक्या योजना राबवून झाल्यानंतर आणखी कसल्या योजना असतील, असा प्रश्न सर्वांना पडेल. पण राजकीय पक्षांना सत्तेत येण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी कोणत्या योजना आणायच्या, त्या सांगण्यासाठी कोणत्याच सल्लागारांची आवश्यकता नसते. मतदारांना काहीतरी मोफत देण्याच्या हेतूने प्रत्येक निवडणुकीला राजकीय पक्षांचे जाहीरनामे भरलेले असतात. यावेळीही अशा काही योजना राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांत असतील. भाजपच नव्हे, तर काँग्रेस, आम आदमी पक्ष यांसारखे सर्वच राजकीय पक्ष आता जाहीरनाम्यांच्या तयारीला लागलेले असतील. सत्तेत असलेल्या भाजपची जमेची बाजू अशी की त्यांना निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याची संधी आहे. सध्या एकेक योजना जाहीर होत आहे. गेल्या दोन दिवसांत चार-चार योजना जाहीर झाल्या. त्याशिवाय ‘माझे घर’, ‘माझा फ्लॅट’ आणि ‘मोफत सिलिंडर’ यांसारख्या योजनांची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. हे सारे चित्र पाहता भाजप योजनांच्या आडून मतदारांना आकर्षित करण्यात आघाडी घेईल, असे दिसते. कारण ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ आणि ‘गृहआधार’ यांसारख्या योजनांच्या मानधनात वाढ करण्याचे प्रस्ताव अजूनही अंमलात आलेले नाहीत. यावरून भाजपने बरेच पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे निवडणुकीच्या धामधुमीत आल्यामुळे मोठा फरक पडला, हे सर्वश्रूत आहे. अशा गोष्टी ऐन निवडणुकीच्या काळात घडल्या, तर त्याचा मोठा प्रभाव मतदारांवर पडतो; विशेषतः महिला वर्गावर. त्यामुळे निवडणूक जवळ येता येता लोकांना थेट योजनांचे लाभ देण्याचा फायदा भाजपला होऊ शकेल. पण गोव्यातील जनता योजनांचा लाभ घेऊनही अमुक पक्षालाच मतदान करेल, याची शाश्वती नाही. यापूर्वीही भाजपने अनेक चांगल्या योजनांची सुरुवात केली, मात्र दोन वेळा मतदारांनी भाजपच्या विरोधात कौल दिला होता. निकालानंतर भाजपने सरकार स्थापन केले, ती गोष्ट वेगळी. यावेळी योजनांची जी खैरात होत आहे, ती मतांमध्ये परिवर्तित होते का, ते निवडणुकीच्या निकालात दिसणार आहे.


