एसटी राजकीय आरक्षणप्रश्नी ७ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी

गोव्यातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीसाठी ठोस वेळापत्रक निश्चित केले असून ७ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th November, 11:59 pm
एसटी राजकीय आरक्षणप्रश्नी ७ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी

पणजी : गोव्यातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीसाठी ठोस वेळापत्रक निश्चित केले असून ७ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे.
या प्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता, अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती तसेच आदेश उच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील याचिकेचा अंतरिम आदेश ३१ डिसेंबरपर्यंतच वैध राहील, तसेच तो पुढे वाढवायचा असल्यास उच्च न्यायालयाला स्वतंत्र आदेश पारित करावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले. गोवा सरकार उच्च न्यायालयात पक्षकार नसल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार गोवा सरकार शुक्रवारी या संदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार अाहे.
दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या एटी समुदायाशी संबंधित इतर खासगी प्रतिवादींना २ तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत उच्च न्यायालयाने दिली. तसेच ७ तारखेपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट करून पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
केंद्र सरकारने गोवा विधानसभा एसटी आरक्षणाची अधिसूचना जारी केल्यानंतर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर रोजी कायद्याच्या कलम ३ नुसार एसटी लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास अंतरिम स्थगिती दिली होती.
जुन्या आकडेवारीनुसार अधिसूचना काढणे योग्य नसून सध्याच्या नवीन आकडेवारीवर आधारित अधिसूचना जारी व्हावी, असे मत उच्च न्यायालयाने त्यावेळी नोंदवले होते. या आदेशाला गोवा सरकार आणि ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करून मुद्दा मांडला होता.
याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची मागणी
माजोर्डा येथील एडविन फर्नांडिस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. या संदर्भात गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता, केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून योग्य प्रक्रिया करून कायदा केला. त्यामुळे याचिका फेटाळण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात भारताचे उप सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी बाजू मांडली.      

हेही वाचा
सर्व पहा