२०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताचा आराखडा सादर

अहमदाबाद केंद्रस्थानी; २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचाही उल्लेख

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
26th November, 11:47 pm
२०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताचा आराखडा सादर

अहमदाबाद : २०३६ च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याबाबतचा आपला दृष्टिकोन आणि सविस्तर आराखडा भारताने गुरुवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) ‘फ्युचर होस्ट कमिशन’समोर सादर केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या सादरीकरणानंतर आयोसीच्या आयोगासोबत सखोल चर्चाही झाली.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) व्हर्च्युअल सादरीकरणाद्वारे अहमदाबाद येथील तयारी, क्रीडा पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित मैदानांची माहिती दिली. २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या बैठकीला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी उपस्थित होते. तसेच आयओएच्या अध्यक्षा पी. टी. उषा, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर आणि आयओए ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षा पी. व्ही. सिंधू यांनीही बैठकीला हजेरी लावली. भारताच्या वतीने आयओसी सदस्य नीता अंबानी यादेखील उपस्थित होत्या.
या सादरीकरणात अहमदाबादच्या तयारीला विशेष प्राधान्य देण्यात आले. क्रीडा सुविधांचा विकास, प्रस्तावित मैदानांचा आराखडा तसेच केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळणारा पाठिंबा याचा तपशील मांडण्यात आला. मोठे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा अनुभव आणि २०३६ च्या स्पर्धांसाठीच्या दीर्घकालीन योजनांवरही भारताने प्रकाश टाकला.
२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपदही अहमदाबादकडे असून, २०३६ च्या ऑलिम्पिक तयारीचा हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे भारताने नमूद केले. शहरात जागतिक दर्जाची क्रीडा मैदाने आणि पूरक पायाभूत सुविधा उभारण्याची योजना सादर करण्यात आली.
सुमारे ३० मिनिटांच्या सादरीकरणानंतर आयओसीच्या फ्युचर होस्ट कमिशन आणि भारतीय शिष्टमंडळात चर्चा झाली. यामध्ये स्पर्धा आयोजनाची योजना, संभाव्य खर्च, निधीची उभारणी, मैदानांचा मास्टर प्लॅन आणि स्पर्धेनंतर मिळणारे दीर्घकालीन लाभ या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
७ देशांशी आयोसीची चर्चा
आयोसीच्या ‘कंटिन्युअस डायलॉग’ टप्प्यात असलेल्या ७ देशांमध्ये सध्या भारताचा समावेश आहे. या प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजेच ‘स्ट्रॅटेजिक डायलॉग’ मार्च २०२७ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. २०३६ च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा भाग असला, तरी यजमान शहर किंवा देशाची निवड अद्याप झालेली नाही.