म्हापसा : आल्तो पर्वरी येथील एका महिलेच्या मुलीला कॅनडामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याकरिता स्टुडंट व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९.६८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी बी. पी. मणिकंटा (३७, रा. मंगळुरू कर्नाटक) याला अटक केली.
पोलिसांनी १० फेब्रुवारी २०२५ रोजी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. संशयित आरोपी हा मंगळुरू येथे असल्याची माहिती २३ नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तांत्रिक पाळत ठेवली व गुप्त माहिती गोळा करत स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताला अटक करण्यात आली. मंगळुरू न्यायालयाच्या ट्राझिंट रिमांडवर आरोपीला गोव्यात आणल्यावर म्हापसा न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, फिर्यादी महिलेला तिच्या मुलीला कॅनडामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवायचे होते. ही बाब सदर महिलेने संशयित आरोपीला सांगितली असता बी. पी. मणिकंटा याने स्टुडंट व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आमिषापोटी तक्रारदार महिलेने त्याला ९ लाख ६८ हजार ४७० रुपये रक्कम दिली. ही रक्कम तिने यूपीआय आणि एनईएफटी व्यवहारांद्वारे आरोपीच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत केली होती.
आरोपीने ही खाती नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची असल्याचे सांगितले होते. मात्र, आरोपीने रक्कम घेऊनही व्हिसा मिळवून दिला नाही किंवा पैसे परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आणि तो सापडत नव्हता. त्याला शोधण्यासाठी बंगळुरू आणि मंगळुरू येथे पोलीस पथके पाठवण्यात आली होती. परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शिरोडकर, कॉन्स्टेबल नीतेश गावडे व जाहिद शेख यांनी संशयिताला कर्नाटक पोलिसांच्या सहाय्याने अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.


