मांद्रे येथे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या बसचालकाला अटक

बस बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून हल्ला

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
26th November, 08:54 pm
मांद्रे येथे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या बसचालकाला अटक

पेडणे : वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बस बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका बसचालकाने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना मांद्रे येथे घडली. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी संबंधित बसचालकाला गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी अटक केली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. मांद्रे पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणराज शेटकर हे अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यासह हरमल पार्किंग परिसराकडे जात होते. यावेळी मांद्रे गार्डनजवळ पोहोचले असता, एका बसमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी बस बाजूला घेण्यास बसचालकाला सांगितल्यानंतर संबंधित चालकाने संताप व्यक्त केला. त्यानंतर बसचालक सूर्यकांत नर्से (वय ३४, कोरगाव) याने पोलीस कर्मचारी गणराज शेटकर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. बसचालकाने त्यांच्या डोक्यावर ठोसे मारून मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

या घटनेप्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.२५ वाजता मांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२ आणि १२१(१) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसचालकाचा यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात सहभाग

या प्रकरणाच्या तपासादरम्यान सूर्यकांत नर्से याच्याविरोधात यापूर्वीही पेडणे पोलीस स्थानकात गंभीर गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे. २०२० मध्ये पेडणे पोलीस स्थानकात गुन्हा खून, बेकायदेशीर जमाव, मारहाण, अडवणूक आणि धमकी यांसारख्या आरोपांशी संबंधित गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

२६ नोव्हेंबर रोजी बसचालकाला  अटक

मांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे नेत २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सूर्यकांत नर्से याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परेश काळे करीत असून पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पेडणे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव यादव यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा
सर्व पहा