४.३० लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी पती-पत्नीला अटक

नोकरीच्या ठिकाणी लाखो रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
26th November, 11:46 pm
४.३० लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी पती-पत्नीला अटक

पेडणे : मालकाने दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत नोकरीच्या ठिकाणीच लाखो रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला मारल्याची घटना पेडणे तालुक्यातील वजरी-भेंडाळे येथे उघडकीस आली. या चोरीप्रकरणी पेडणे पोलिसांनी पती-पत्नी अशा दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या रकमेपैकी १ लाख ५८ हजार रुपये जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वजरी-भेंडाळे येथील रहिवासी सिद्धेश प्रताप भेंडेळकर यांनी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पेडणे पोलीस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत भेंडाळे येथील नाना शेट यांच्या इमारतीत चोरीची घटना घडली.

संशयित आरोपी आशिक अँथनी हा तक्रारदाराकडे वाहनचालक म्हणून कामाला होता. त्याने नोकरीच्या ठिकाणी असताना ४५ हजार रुपये रोख चोरल्याचा आरोप आहे. तर त्याची पत्नी नेहा अँथनी हिला पेंट आणि हार्डवेअर दुकानातील कामाची जबाबदारी देण्यात आली होती. तिनेही या संधीचा गैरफायदा घेत २० ते ३० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व सोन्याचे पेंडंट, १० हजार रुपये रोख तसेच दुकानासाठी देण्यात आलेली ७५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम चोरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींनी नोकरीच्या माध्यमातून मिळालेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत तक्रारदाराच्या मालमत्तेचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या चोरीमुळे तक्रारदाराचे अंदाजे ४ लाख ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

सावंतवाडीतून एकाला अटक; पत्नीही पोलिसांच्या ताब्यात

फरार असलेला आरोपी आशिक जोसेफ अँथनी (वय ३४, मूळ रा. एर्नाकुलम, केरळ) याचा शोध घेत पोलिसांनी त्याला महाराष्ट्रातील सावंतवाडी येथे ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पेडणे पोलीस स्थानकात आणून १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.

त्यानंतर या प्रकरणातील सहआरोपी नेहा (वय ३२, मूळ रा. केरळ) हिला २४ नोव्हेंबर २०२६ रोजी याच गुन्ह्यात अटक करण्यात आली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर करीत आहेत. पेडणे पोलीस निरीक्षक नितीन व्ही. हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पेडणे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव यादव यांच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

१ लाख ५८ हजारांची रक्कम जप्त

चोरीला गेलेल्या रकमेपैकी १ लाख ५८ हजार रुपये सावंतवाडी पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी जप्त केले. आशिक जोसेफ अँथनी याची रवानगी सध्या कोलवाळ येथील न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर महिला आरोपी नेहा आर. रवी हिला ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा