मडगाव : विधानसभा निवडणुकीसाठी पुढील आठ ते दहा दिवसांत युतीची घोषणा करण्यात येईल. पण प्रत्येक मताचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी लागेल. तसे झाल्यास खर्या अर्थाने संविधानाचे रक्षणही आपण करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केले.
गोवा राखण अभियानचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी मडगाव येथील लोहिया मैदानावर झाला. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी भाजपच्या मागील १५ वर्षांतील कारभाराची माहिती घरोघरी पोहोचवली जाईल असे सांगण्यात आले. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, यशोमती ठाकूर, अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, एम. के. शेख आदी उपस्थित होते.
ठाकरे यांनी सांगितले की, राज्यात काँग्रेसच्या सभा होऊ नये यासाठी सरकार परवानगी देण्यास चालढकल करत आहे. संविधान दिनाची सुरुवात काँग्रेसने १५ वर्षांपूर्वीच केलेली होती. मतचोरी करुन संविधानाने दिलेल्या हक्कांची पायामल्ली करण्यात येत आहे. प्रत्येक मताचे रक्षण करण्याची जबाबदारी उचलावी लागेल. गोव्यातील गोवा राखण यात्रेतून लोकांची मते, समस्या जाणून घेत काँग्रेसमध्ये लोकांना नवी आशा दिसून येत आहे. संविधानाने सर्वांना हक्क व अधिकार दिलेले असून त्याच संविधानावर भाजपकडून हल्ला केला जात आहे. काँग्रेसचे आठ लोक गेल्यावेळी निवडून येत त्यांनी गद्दारी केली व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मतदारांनी धडा शिकवावा.
काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर भाजपच्या बाजूला जाण्याचे काम यापुढे कोणीही करू नये. तसे झाल्यास त्यांना निवडून देणार्या महिलांकडून चपलेने मार मिळेल एवढे नक्की लक्षात ठेवावे, असा इशारा अंजली निंबाळकर यांनी दिला.
निवडणूक आयोग हा भाजपचाच घटक : चोडणकर
गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, भाजपने कधीच या संविधानाला मानलेले नाही. ते केवळ आरएसएसची बाजू घेऊन होते. त्यांनी अनेक वेळा संविधानावर हल्ला केलेला आहे. पण हे संविधान राखण्याचे काम जनतेने केले आहे. महिलांना हक्क देणे, एसटी समाजाला हक्क देणे, सर्वांना समान अधिकार देण्याचे काम संविधान करते. पण हे भाजपला मान्य नसल्याचे दिसते. निवडणूक आयोग हा भाजपचाच घटक असल्यासारखे काम करत आहे. त्यांना पाहिजे त्याप्रमाणे निर्णय घेणे, मते काढून टाकणे असे प्रकार करत आहे. राज्यातील दोन पक्षांशी युती करुन आगामी सरकार हे काँग्रेसचेच येईल.


