अमायरा धुमटकरची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
26th November, 11:54 pm
अमायरा धुमटकरची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

पणजी : गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अमायरा अमर धुमटकर हिने योनेक्स-सनराईज पाचव्या मिनी (११ वर्षांखालील) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मधील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली असून ती राष्ट्रीय सुवर्णपदकापासून केवळ एक विजय दूर आहे. उपांत्य फेरीत तिने महाराष्ट्राच्या रिशा काडियान हिचा सरळ गेममध्ये संयमी खेळ करत पराभव केला. छत्तीसगडमधील रायपूर येथे २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा सुरू आहे.
अव्वल मानांकित अमायराने अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दोन्ही गेममध्ये दबावाखाली उत्कृष्ट खेळ करत १५-१३, १५-१३ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत अमायराने राजस्थानच्या राशी सिंघल हिच्यावर १५-६, १५-४ असा एकतर्फी विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी ११ वर्षांखालील मुलींच्या एकेरीची उपांत्य फेरी गाठणारी गोव्याची पहिलीच खेळाडू होण्याचा मान पटकावला होता.
गेल्या वर्षी गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी कांस्यपदक जिंकले होते. आता किमान रौप्यपदक आणि गोव्यासाठी सलग दुसरे राष्ट्रीय पदक निश्चित झाल्यानंतर अमायराचे लक्ष्य विजेतेपदावर आहे.