वाहतूक शिस्तीला तडा जातोय का ?

Story: अंतरंग |
26th November, 11:46 pm
वाहतूक शिस्तीला तडा जातोय का ?

शहरातील रस्ते सुरक्षित राहावेत, अपघात आणि जीवितहानीचे प्रमाण कमी व्हावे तसेच वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये, हा वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीचा मुख्य गाभा आहे. यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असले, तरी ही कारवाई पारदर्शक, नियमबद्ध आणि अपघातप्रवण ठिकाणांवर केंद्रित असणे तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही अपघात आणि मृत्यूच्या आकडेवारीत फारसा दिलासादायक बदल दिसून आलेला नाही. असे असतानाही वाहतूक पोलिसांची पथके अपघातप्रवण ‘ब्लॅकस्पॉट’ऐवजी शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या मुख्य मार्गांवर, विशेषतः सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेआड थांबलेली दिसतात, ही बाब गंभीर चिंतेची ठरते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलन यंत्राद्वारे अधिकृत कारवाई होणे अपेक्षित असते आणि त्यासाठी वाहनचालकाचा थेट फोटो त्या यंत्रात घेण्याची पद्धत आहे. मात्र, अनेक ठिकाणी ई-चलन यंत्रे बाजूला ठेवून स्वतःच्या खासगी मोबाईलमध्ये फोटो काढणे आणि त्यानंतर रोखीने रक्कम स्वीकारणे असे प्रकार घडत असल्याचे समोर आले. समाजमाध्यमांवर असे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून बैठका घेतल्या जातात, वर्तनाबाबत सूचना दिल्या जातात आणि कारवाईचे आश्वासन दिले जाते. परंतु, काही दिवसांतच परिस्थिती 'जैसे थे' होते, असा अनुभव नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. यापूर्वी खरेदी करण्यात आलेले बॉडी वॉर्न कॅमेरेही कालांतराने कुणी वापरत नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक वाहतूक अंमलदाराकडे कार्यरत बॉडी वॉर्न कॅमेरा असणे बंधनकारक केल्यास रस्त्यावरील प्रत्येक व्यवहाराची नोंद राहील आणि गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.

शहरातील काही ठरावीक चौक आणि नाक्यांवर वाहतूक अंमलदारांची उपस्थिती आणि त्यांच्या वर्तनाबाबत वारंवार तक्रारी ऐकायला मिळतात. काही ठिकाणी स्थानिक घटकांशी संगनमत करून वाहनचालकांना विनाकारण अडवले जाते, तर सर्व कागदपत्रे आणि परवाना असूनही विविध कारणे पुढे करून पैसे मागितले जातात, असे अनुभवही पुढे आले आहेत. दंडाच्या रकमेपेक्षा अधिक त्रास आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी अनेक प्रामाणिक वाहनचालक तडजोड करतात किंवा तक्रार करण्याचे टाळतात. परिणामी, नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी आर्थिक व्यवहारांना प्राधान्य मिळत असल्याची भावना समाजात बळावत आहे. दुसरीकडे, ज्या चौकांमध्ये दररोज वाहतूक कोंडी होते, तेथे कायमस्वरूपी बंदोबस्त नसल्यामुळे नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागते. तरुणाई आणि नव्या पिढीसाठी वाहतूक शिस्त, कायद्याचा आदर आणि डिजिटल पारदर्शकता हे अत्यंत संवेदनशील विषय आहेत. आजचा तरुण वर्ग प्रत्येक गोष्टीमागील तर्क, पारदर्शकता आणि जबाबदारीची अपेक्षा ठेवतो. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा योग्य वापर, जबाबदारीची निश्चिती आणि नागरिकांचा विश्वास जपणे ही काळाची गरज आहे. केवळ तात्पुरत्या सूचना किंवा एखाद्या घटनेपुरती कारवाई न करता, वाहतूक नियोजनाची रचना बदलणे आवश्यक आहे. अपघात कमी करण्यासाठी ‘ब्लॅकस्पॉट’वर लक्ष केंद्रित करणे, कोंडीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवणे आणि बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांसह ई-चलनचा काटेकोर वापर करणे, यातूनच वाहतूक पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होऊ शकेल.