आता समुद्रात सायबर युद्धाचे सावट

Story: विश्वरंग |
24th November, 11:40 pm
आता समुद्रात सायबर युद्धाचे सावट

युद्धाचे स्वरूप बदलत आहे. आतापर्यंत क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि नौदलाच्या हालचालींमधून सुरू असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता डिजिटल यंत्रणांपर्यंत पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. समुद्रात प्रवास करणाऱ्या तेलवाहू टँकर आणि व्यापारी जहाजांना सायबर हल्ल्यांद्वारे लक्ष्य केले जात असल्याचा अमेरिकेला संशय आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, सुमारे ५० जहाजांवर अशा प्रकारचे हल्ले झाल्याची शक्यता तपासली जात आहे. या घटनांमध्ये इराणचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असला, तरी त्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य केवळ जहाजांच्या सुरक्षिततेपुरते मर्यादित नाही. तेल, एलपीजी, रासायनिक पदार्थ आणि इतर धोकादायक मालाची वाहतूक करणारी जहाजे सायबर हल्ल्यांच्या कक्षेत येत असतील, तर त्याचे परिणाम जागतिक व्यापारावर होऊ शकतात. आधुनिक जहाजांचे दिशादर्शन, संवाद, मालवाहतूक आणि इतर महत्त्वाच्या प्रक्रिया डिजिटल प्रणालींवर अवलंबून असतात. अशा यंत्रणांमध्ये हस्तक्षेप झाला तर जहाजांच्या हालचाली विस्कळीत होण्याबरोबरच अपघात आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.

या संघर्षात होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व विशेष आहे. जगातील तेल व्यापाराचा मोठा हिस्सा या अरुंद समुद्री मार्गातून जातो. त्यामुळे येथे निर्माण होणारा कोणताही अडथळा केवळ अमेरिका आणि इराणपुरता मर्यादित राहत नाही. तेलपुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमतींवर दबाव येऊ शकतो. परिणामी, भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांनाही त्याची झळ बसू शकते. इंधनाचे दर, वाहतूक खर्च आणि महागाईवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनांमधील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे सायबर हल्ल्यांसाठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेले फोर्टिनेट राउटर. या उपकरणांमधील सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊन हल्ले केले जात असल्याचे अधिकारी आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने अमेरिकेकडे येणाऱ्या काही प्रभावित जहाजांच्या मदतीसाठी सायबर सुरक्षा पथके तैनात केली आहेत. म्हणजेच, समुद्रातील सुरक्षेसाठी आता युद्धनौकांइतकीच सायबर तज्ज्ञांचीही गरज निर्माण होत आहे. अमेरिकेला या हल्ल्यांमागे इराणचा संशय असला, तरी रशियाचाही संभाव्य सहभाग तपासला जात असल्याचे वृत्त आहे. मात्र, संशय आणि सिद्ध झालेला सहभाग यात फरक आहे. त्यामुळे या घटनांना थेट इराण किंवा रशियाची संयुक्त कारवाई म्हणणे सध्या घाईचे ठरेल.

या घडामोडींचा मोठा अर्थ असा की, भविष्यातील युद्ध केवळ जमिनीवर, आकाशात किंवा समुद्रात लढले जाणार नाही. शत्रूच्या डिजिटल यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून त्याची आर्थिक आणि सामरिक क्षमता विस्कळीत करणे हेही युद्धाचे प्रभावी साधन बनत आहे. विशेष म्हणजे, अशा हल्ल्यांमध्ये प्रत्यक्ष स्फोट न घडवता मोठे नुकसान घडवण्याची क्षमता असते.