क्रिकेटमधील चमत्कार

बाराव्या वर्षी रणजीमध्ये आणि त्यानंतर तेराव्या वर्षी आयपीएल गाजवणारा वैभव यापुढेही अशीच चमकदार खेळी करत राहो. त्याच्यासमोर अजून बरीच वर्षे आहेत, त्यामुळे सर्वांचे विक्रम मोडून त्याने क्रिकेटमधला नवा अध्याय लिहावा. अशा खेळाडूंमुळेच भारतीय संघाला चांगले भवितव्य आहे, ही बाबही अधोरेखित होते.

Story: संपादकीय |
24th November, 11:42 pm
क्रिकेटमधील चमत्कार

वयाच्या तेराव्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करून आपल्या खेळाने सर्वांना अचंबित करणारा वैभव सूर्यवंशी हा खुशालचेंडू दिसणारा मुलगा वयाच्या पंधराव्या वर्षी भारतीय संघात खेळून यूएई विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात ५२ चेंडूत द्विशतक झळकावून नवा विक्रम रचतो, हे सारे क्रिकेटच्या जगाला सध्या भारावून सोडणारे आहे. ‘ए’ श्रेणीच्या क्रिकेटमध्ये त्याची ही कामगिरी पुढे अनंत वर्षे वैभवाने पाहिली जाईल. कुठलाच गोलंदाज त्याच्यासमोर टिकत नाही. आपल्या आक्रमक खेळानेच वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत भल्या भल्या गोलंदाजांनाही मैदानाची सीमा दाखवलेली आहे. त्यामुळे त्याच्या खेळातील जादू टिकावी आणि त्याचा खेळ पाहणे हा सर्वांसाठी एक अद्भूत अनुभव ठरावा, अशीच चाहत्यांची मनोकामना आहे. आयपीएलमध्ये आपल्या खेळाने त्याने सर्वांना वेड लावलेच आहे. मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळताना त्याने फक्त ५२ चेंडूत द्विशतक पूर्ण करून क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. फक्त धावसंख्येचा विक्रम नसून कमी वयात अशी खेळी करून वैभवने क्रिकेटविश्वाला एका आश्चर्याचा धक्काच दिला आहे. आपल्या चाहत्यांना आणि क्रिकेटच्या कोट्यवधी चाहत्यांना त्याने आपल्या खेळाने थक्क केले आहे. चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि सोबतच आक्रमकता, आत्मविश्वास हा त्याच्या खेळाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. चॅड बोवेस, ट्रॅव्हीस हेड, नारायण जगदीशन, हॅरी ब्रूक अशा खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांत द्विशतके पूर्ण केली आहेत, मात्र त्यांच्या चेंडूंची संख्या ही शंभरपेक्षा जास्त आहे. आतापर्यंतचे आकडे पाहिले, तर ५२ चेंडूत द्विशतक ही बाबच अविश्वसनीय आहे. काहीवेळ डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही, अशी ही खेळी आहे. त्यामुळेच वैभव सूर्यवंशीची ही कामगिरी क्रिकेट जगतातील ‘न भुतो न भविष्यती’ विक्रम ठरली आहे. चेंडू आणि धावसंख्या पाहता हा विक्रम इतक्यात कोणी मोडण्याची शक्यताही दिसत नाही. एवढ्या वयात एका परिपक्व फलंदाजाची क्षमता दाखवणारा खेळ वैभव सूर्यवंशीकडून होत आहे, हे आश्चर्यच आहे. विशेष म्हणजे वैभवने हे द्विशतक २८ षटकार ठोकून पूर्ण केले आहे. यात फक्त सात चौकार आहेत. म्हणजे हा क्रिकेटच्या जगतातला नवा झंझावातच म्हणावा लागेल, जो षटकारांच्या जोरावरच खेळ करत आहे. चौकार त्याच्यासाठी नगण्य आहेत.

क्रिकेटच्या दुनियेत विक्रम होत असतात, पण काही विक्रम हे सर्वसाधारण नसतात. ते चमत्कारापेक्षाही कमी नसतात. त्यातलाच हा एक विक्रम आहे. हा विक्रम मोडला जात नाही, तोपर्यंत तो दंतकथेतला एखादा किस्सा भासावा तसा चमत्कारच आहे. या विक्रमामुळे १५ वर्षे वयाच्या वैभवची क्षमता काय आहे, त्याची फक्त कल्पनाच करावी. आपल्या खेळाने सर्वांना हादरवून सोडणाऱ्या वैभवची ही गोष्ट आता वर्षानुवर्षे सांगितली जाईल. १६ चेंडूत अर्धशतक, २८ चेंडूत शतक या वेगाच्या तुलनेत ५२ चेंडूत द्विशतक पूर्ण करणारा हा खेळाडू साक्षात जादुगारच आहे. ५२ चेंडूत २०४ धावा करून विक्रम करणाऱ्या वैभवने ‘लिस्ट ए’मधील असलेले विक्रम मोडून नवा इतिहास रचला आहे, जो यापुढेही कोणी कधी मोडण्याची शक्यता दिसत नाही. एकाच खेळाडूत काय काय शोधावे, हाच सर्वांना प्रश्न पडला आहे. निरागसता त्याच्या चेहऱ्यावरच आहे. कमी वयाचा, प्रचंड क्षमतेचा, कौशल्यपूर्ण खेळ करणारा अफाट नियंत्रण असलेला वैभव आज प्रोत्साहित करणाऱ्या सगळ्याच बिरुदांचा मालक ठरला आहे. बाराव्या वर्षी रणजीमध्ये आणि त्यानंतर तेराव्या वर्षी आयपीएल गाजवणारा वैभव यापुढेही अशीच चमकदार खेळी करत राहो. त्याच्यासमोर अजून बरीच वर्षे आहेत, त्यामुळे सर्वांचे विक्रम मोडून त्याने क्रिकेटमधला नवा अध्याय लिहावा. अशा खेळाडूंमुळेच भारतीय संघाला चांगले भवितव्य आहे, ही बाबही अधोरेखित होते. पंधराव्या वर्षी हा विक्रम करून वैभवने हा विक्रम मोडण्याचा विचार करणाऱ्यांनाही दारे बंद केली आहेत. फक्त हा त्याचा खेळ सुरू रहावा, त्याच्यावर कुठल्याच अपेक्षा लादल्या जाऊ नयेत. क्रिकेटचे विश्व मोठे आहे. या विश्वात वैभव आपले नाव सर्वश्रेष्ठांच्या यादीत सर्वांत वर कोरू पाहत असेल, तर त्याला मनःपूर्वक यश चिंतूया.