दारूच्या दुकानाबाहेरच डॉक्टरांचा दवाखाना!; मद्यपींची दारू खरेदीपूर्वी आरोग्य तपासणी

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात अनोखी मोहीम; रक्त तपासणी, औषधोपचार आणि मद्यपान कमी करण्यासाठी समुपदेशन : मद्यपानामुळे होणारे मृत्यू आणि आरोग्याच्या वाढत्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य प्रदेशातील सागर जिल्हा प्रशासनाने एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. दारू खरेदी करण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांची चक्क दुकानाबाहेरच आरोग्य तपासणी केली जात आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
दारूच्या दुकानाबाहेरच डॉक्टरांचा दवाखाना!; मद्यपींची दारू खरेदीपूर्वी आरोग्य तपासणी

मध्य प्रदेश : मद्यपानामुळे होणारे मृत्यू आणि आरोग्याच्या वाढत्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य प्रदेशातील सागर जिल्हा प्रशासनाने एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. दारू खरेदी करण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांची चक्क दुकानाबाहेरच आरोग्य तपासणी केली जात आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दारूच्या दुकानाबाहेर टेबल मांडून ग्राहकांची तपासणी करत असून, काहींच्या रक्ताचे नमुनेही घेतले जात आहेत. (In an unusual health awareness initiative, doctors and health workers in Madhya Pradesh's Sagar district have started conducting medical check-ups outside liquor shops to assess the health of people who come to buy). alcohol.  मद्यपींना त्यांच्या आरोग्याची जाणीव करून देणे आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

आरोग्य विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये वैद्यकीय पथके दारूच्या दुकानांबाहेर जाऊन ग्राहकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या मद्यपानाच्या सवयी, वैद्यकीय इतिहास आणि आरोग्यविषयक तक्रारींची माहिती घेतली जात आहे. डॉक्टरांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. आवश्यकतेनुसार रक्ताचे नमुनेही गोळा केले जात आहेत.

या मोहिमेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दारूच्या दुकानाबाहेर स्टेथोस्कोप आणि वैद्यकीय उपकरणांसह उभे असलेले डॉक्टर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नियमित आरोग्य तपासणी टाळणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर दारू खरेदीसाठी आलेले ग्राहक अशा ठिकाणी आरोग्यविषयक सल्ला कितपत स्वीकारतील, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सागर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बनावट दारूमुळे झालेल्या कथित विषबाधेच्या घटनेत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अवैध दारू विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बांदा परिसरातील मृतांच्या शवविच्छेदन अहवालात काही जणांना आधीपासूनच आरोग्यविषयक समस्या असल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यानंतर प्रशासनाने नियमित मद्यपान करणाऱ्यांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्याचा निर्णय घेतला.

या मोहिमेत केवळ तपासणीच नव्हे, तर मद्यपानाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीही केली जात आहे. गरजेनुसार औषधे आणि मल्टिव्हिटॅमिन दिले जात आहे. मद्यपानाचे प्रमाण कसे कमी करता येईल, याबाबत समुपदेशन केले जात आहे. रिकाम्या पोटी मद्यपान करू नये, तसेच आधीच उघडलेल्या बाटल्यांमधील दारू पिणे टाळावे, असा सल्लाही दिला जात आहे. त्याचबरोबर अनधिकृत विक्रेत्यांकडून दारू न घेता केवळ परवानाधारक सरकारी दुकानांतूनच खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे.

सोमवारी सागर शहरासह देवरी, रहली, बिना आणि खुरई येथे संयुक्त पथकाने ९७ जणांची आरोग्य तपासणी केली. या वेळी संबंधितांना वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दारू खरेदीसाठी दुकानात गेलेल्या ग्राहकांना आता आधी आरोग्याची तपासणी आणि मग दारूचा विचार, असा संदेश या मोहिमेतून दिला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा