दोडामार्ग : गेल्या काही दिवसांपासून गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांत एकट्याने भटकंती करणाऱ्या ओंकार हत्तीची अखेर आपल्या कळपाशी भेट झाली. बुधवारी कोलझर येथील जंगलात ओंकारची कळपाशी भेट झाल्याने त्याच्या भटकंतीला पूर्णविराम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. (Omkar elephant reunites with herd in kolzar forest).
ओंकार हत्ती गेल्या काही काळापासून आपल्या मूळ कळपापासून वेगळा झाला होता. कळपापासून दुरावल्याने तो गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांत एकटाच फिरत होता. या भटकंतीदरम्यान त्याने अनेक गावांच्या परिसरांतून प्रवास केला. शिवाय त्याने शेती, बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचे त्याच्या हालचालींकडे लक्ष लागून होते.
दरम्यान, बुधवारी कोलझरच्या जंगलात ओंकारची हत्तींच्या कळपाशी भेट झाली. दीर्घकाळ एकट्याने भटकंती केल्यानंतर तो पुन्हा आपल्या सहकाऱ्यांच्या सान्निध्यात आला आहे. ओंकार आता कळपात कितपत रमतो आणि त्याचा पुढील वावर कोणत्या भागात राहतो, याकडे नागरिक, वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे लक्ष लागले आहे.


