पणजी : बनावट उत्पादन शुल्क आयुक्त नियुक्ती फसवणूक प्रकरणातील संशयित अजित शंखवाळकर याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पर्वरी परिसरात भूखंड देण्याच्या बहाण्याने शंखवाळकर याने तळेकर कुटुंबीयांची ९७.४३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. संशयित शंखवाळकर याच्याविरोधात आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणी अनिल तळेकर यांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अजित शंखवाळकर याने ४ एप्रिल २०२२ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्वरी येथील सर्व्हे क्रमांक १७६/१ मधील ३६८.५ चौ. मीटर भूखंड देण्याच्या बहाण्याने ९७ लाख ४३ हजार ७०० रुपये घेतले. तळेकर यांनी ही रक्कम चेक आणि ऑनलाईन पद्धतीने दिली होती. पैसे स्वीकारूनही शंखवाळकर याने विक्री करार न केल्यामुळे आपली फसवणूक झाली, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
पीडितांच्या तक्रारीची दखल घेत पर्वरी पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी संशयित अजित शंखवाळकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
संशयित अजित शंखवाळकर याच्याविरोधात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल झाले असून, आता गुन्ह्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. दुसरी तक्रार मनोज तळेकर यांच्या वडिलांनी दिली असून, त्यांच्या मुलाला आणि मुलीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन शंखवाळकर याने ५२ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.


