बहुचर्चित आसगावातील आगरवाडेकर प्रकरणानंतर आता आश्वे-मांद्रे येथील ब्रिटो कुटुंबियांना त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेतून बेघर करण्याच्या प्रकरणात राज्याच्या पोलीस महासंचालकांचे नाव समोर आले आहे. आपल्या सग्यासोयर्यांच्या किंवा धनवंतांच्या लाडापोटी हे परप्रांतीय वरिष्ठ अधिकारी गोमंतकीयांच्या मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. या वरिष्ठ पोलीस अधिकार्याचा दबाव झिडकावून निज गोवेकरांना संरक्षण देण्याची धमक भ्रष्ट गोमंतकीय अधिकार्यांत नाही. यामुळे परप्रांतीय बिल्डर लॉबी असो किंवा अब्जाधीश लोक, गोमंतकीयांना गृहीत धरत आहेत. हे अपयश निज गोवेकरांचे नसून त्या गोमंतकीय अधिकार्यांचेच आहे.
सरकारी सेवा स्वीकारणारे अधिकारी किंवा कर्मचार्यांना कायदा, सेवेप्रती निष्ठा आणि जनतेला न्याय मिळवून देण्याची शपथ घ्यावी लागते. या प्रतिज्ञेला जागणारे आणि कायदा, नियमानुसार लोकसेवा देणारे अधिकारी क्वचितच सापडतील. बहुतेक अधिकारी हे राजकारणी लोकांच्या आहारी गेलेले असतात. राजकारणी लोक किंवा आपले वरिष्ठ जे सांगतात त्याची कार्यवाही ही एखाद्या नंदीबैलाप्रमाणे करण्यातच धन्यता मानली जाते, तेव्हा सर्वसामान्य जनतेला न्याय तरी कसा मिळेल?
हल्लीच्या काळात गोव्यातील लोकांना मालमत्तेपासून बेघर करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. बनावटगिरी तसेच जबरदस्तीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू असून या बेकायदा प्रकारांना राजकारणी आणि सरकारी अधिकार्यांचे खतपाणी मिळत आहे.
आसगावातील आगरवाडेकर कुटुंबियांना घराबाहेर काढण्याच्या प्रकारानंतरही सरकारी अधिकारी आणि आपले लोकप्रतिनिधी याची दखल घेतील, असे लोकांना वाटत होते. परंतु त्यानंतरही पोलीस, बाऊन्सर आणि सरकारी अधिकार्यांच्या माध्यमातून गोमंतकीयांची घरे आणि मालमत्ता बळकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. मांद्रेतील लोकांसाठी सध्या घडलेला हा प्रकार नवीन नाही. याअगोदर २०२४ मध्ये असाच प्रकार घडला होता. तरीही स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांना गावात अशी कृत्ये घडू नयेत यावर ठोस उपाय काढावा, असे वाटले नाही.
पेडणे असो किंवा संपूर्ण गोव्यातील किनारपट्टीवरील बहुतेक पर्यटन व्यवसाय हा विदेशी किंवा परप्रांतीय लोकांकडून चालवला जातो. पर्यटनाच्या नावाखाली येऊन गोव्यात हे लोक व्यवसाय करतात. गोमंतकीय लोक या नागरिकांना आपल्या मालमत्ता व्यवसायासाठी देत असल्यानेच हा बेकायदा प्रकार घडत आहे. कारण हा अवैध प्रकार अडवण्याची धमक राजकारण्यांच्या हाताखालची बाहुली ठरणार्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी यंत्रणेला नाही.


