येत्या विधानसभा निवडणुकीत गोवा विधानसभेत आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याची आशा हळूहळू मावळत आहे. मावळत आहे म्हणण्यापेक्षा ती आता अशक्य अशी गोष्ट होत आहे. हा विषय पुढे जाईल, आरक्षण मिळेल असे दिसण्यासाठी आशेचा एकमेव किरण होता, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याचे टाळल्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींना आरक्षण मिळणार नाही, हे एखाद्या काळ्या दगडावरच्या रेषेइतके स्पष्ट आहे. मागील महिन्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिसूचित होणार होती. त्यासाठी २०११ पूर्वी एका सर्वेनुसार तयार करण्यात आलेल्या काही राज्यांतील आदिवासींच्या लोकसंख्येचा आधार घेण्यात येणार होता. भारताच्या महानिबंधकांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये एक अधिसूचना काढली होती, त्यात गोव्यातील आदिवासी लोकसंख्या १.३३ लाख एवढी निश्चित होती. कदाचित त्या लोकसंख्येच्या आधारे गोव्यातील आदिवासींची लोकसंख्या अधिसूचित होणार होती. तीच लोकसंख्या जनगणना आयोग अधिसूचित करणार होता की नाही, ते बाहेर येण्यापूर्वीच स्थगिती दिल्यामुळे ते गुलदस्त्यात राहिले. गोव्यातील उच्च न्यायालयाने आदिवासींच्या लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास स्थगिती दिल्यानंतर त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती, पण आता सर्वोच्च न्यायालयानेही त्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दर्शविला. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून फेब्रुवारीच्या दरम्यान होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींना चार जागांचे आरक्षण मिळणे अशक्य झाले आहे.
गोव्यातील आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे चार मतदारसंघ आरक्षित करावेत, असे ठरले होते. त्यासाठी प्रियोळ, नुवे, केपे आणि सांगे या चार मतदारसंघांचा समावेश होण्याची शक्यता होती. आता राज्यात नवी जनगणना सुरू असून ती १० जानेवारीपर्यंत संपुष्टात येईल. एका बाजूने जनगणना सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने जुन्या आकड्यांनुसार आरक्षण देणे, हेही योग्य होणार नाही. त्यासाठी नव्या जनगणनेच्या आकड्यांची वाट पाहणे उचित ठरेल हे जरी खरे असले, तरी केंद्राने तयार केलेल्या आदेशाचा उद्देश सद्यस्थितीत साध्य होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. कारण २०२७ च्या निवडणुकीत आरक्षण देता येईल या हेतूने केंद्राने मागील वर्षी कायदा केला होता. आता हे आरक्षणच मिळत नसेल, तर आंदोलने व मागण्या करून केंद्राने त्या मान्य केल्यानंतर घाईघाईने कायदा केला, तरी त्याचा शेवटी काहीच उपयोग होणार नाही. राजकीय भूमिकेतून विचार केला, तर आदिवासी समाजामध्ये आपली काहीशी थट्टा झाल्याची भावना सध्या आहे. त्यामुळेच सध्या गोव्यात 'शेड्यूल ट्राइब्स ऑफ गोवा' या बॅनरखाली राज्यभर आदिवासी समाजाच्या बैठका सुरू आहेत. दुसऱ्या बाजूने ‘उटा’चेही पदाधिकारी आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीत आदिवासी समाजाचा संताप काहीसा दिसू शकतो. दिसणारही आहे. फक्त त्याचे परिणाम काय असतील, ते मतमोजणीनंतर कळेल. भाजपने आदिवासी समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा केला, पण त्याची अंमलबजावणी करण्यात उशीर केला, असा आरोप आदिवासी समाजाकडून होत आहे. मात्र, आदिवासी समाज राजकीयदृष्ट्याही विभागलेला असल्यामुळे एक गट भाजपविरोधी भूमिका घेण्याची शक्यता आहे, तर दुसरा गट भाजपकडून उमेदवारी मिळवू शकतो. काँग्रेस या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण आदिवासी समाज आरक्षण मिळाले नाही म्हणून जरी नाराज दिसत असला, तरी शेवटी आपली राजकीय भूमिका तो घेणारच आहे. त्याचा फायदा भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांना होईल. एकाच पक्षाला नुकसान होईल असे चित्र अजिबात नाही; ते यासाठीच, कारण आदिवासी समाज आणि त्यांचे नेतेही पक्षांमध्ये विभागले गेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने लोकसंख्या अधिसूचित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली त्याचवेळी येत्या निवडणुकीत आरक्षण मिळणार नाही, असे दिसत होते. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राकडे विनंती करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. उच्च न्यायालयाचा आदेश आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी यात २५ दिवस गेले. आता निवडणूक जाहीर होण्यास जेमतेम दीड महिना आहे. त्यामुळे दीड महिन्यात आदिवासी आरक्षण मिळू शकेल, अशी अपेक्षाही ठेवणे योग्य होणार नाही. आदिवासी समाजाला अजून काही वर्षे यासाठी वाट पाहावी लागेल, असेच सध्या तरी दिसत आहे. तरीही आशा सोडू नये. ही दुनियाच आशेच्या धाग्यावर टिकून आहे.


