सामान्य नागरिक वाढत्या महागाईने त्रस्त

एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न वाढले, पण त्याच वेळी अन्न, शिक्षण, आरोग्य आणि घरखर्च यांचा खर्च अधिक वाढला, तर त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असे म्हणता येईल का, हा खरा प्रश्न आहे.

Story: विचारचक्र |
26th November, 11:47 pm
सामान्य नागरिक वाढत्या महागाईने त्रस्त

पगार वाढतोय, उत्पन्नाचे आकडे वाढताहेत; पण सामान्य माणसाच्या हातात महिनाअखेरीस पैसे का उरत नाहीत, हा प्रश्न आज प्रत्येक कुटुंबाला पडत आहे. महागाई हा केवळ अर्थव्यवस्थेतील आकडेवारीचा विषय राहिलेला नाही, तर तो प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला प्रश्न बनला आहे. स्वयंपाकघरातील किराणा, भाजीपाला, दूध, खाद्यतेल, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, औषधे, शिक्षण आणि घरभाडे अशा प्रत्येक आघाडीवर होणारा खर्च सामान्य माणसाच्या आर्थिक नियोजनाला हादरे देत आहे.

महागाईची खरी झळ श्रीमंतांपेक्षा मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अधिक बसते. कारण श्रीमंत माणसाच्या खर्चात वाढ झाली, तर त्याच्या जीवनशैलीत काही बदल होतो; परंतु सामान्य माणसाच्या खर्चात वाढ झाली, तर त्याला आपल्या गरजांनाच कात्री लावावी लागते. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, घरातील ज्येष्ठांची औषधे आणि भविष्यासाठीची बचत या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. त्यामुळे महागाईचा प्रश्न हा केवळ पैशांचा नसून सामाजिक सुरक्षिततेचाही आहे.

महागाई किती आहे, हे ठरवण्यासाठी सरकार ग्राहक किंमत निर्देशांक, अर्थात सीपीआयचा आधार घेते. परंतु सरकारी आकडेवारी आणि सामान्य ग्राहकाला बाजारात जाणवणारी महागाई यांमध्ये अनेकदा फरक जाणवतो. केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२६ मध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्के होता. त्याच वेळी अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांशी संबंधित महागाईचा दर तब्बल ८.९४ टक्क्यांवर पोहोचला. ग्रामीण भागातील अन्नमहागाई ९.०९ टक्के, तर शहरी भागातील ८.६८ टक्के होती. सप्टेंबरच्या तुलनेतही महागाई वाढल्याचे या आकडेवारीतून दिसते. महागाईचा दर ६ टक्के आहे म्हणजे वस्तूंच्या किमती ६ टक्क्यांनी कमी झाल्या, असा अर्थ होत नाही. उलट मागील वर्षाच्या तुलनेत किमती आणखी वाढल्या आहेत. आधीच वाढलेल्या किमतींवर पुन्हा वाढ होत असल्याने सामान्य ग्राहकाची आर्थिक कोंडी अधिक गंभीर बनते. महागाईचा सर्वाधिक परिणाम घरातील गृहिणीच्या बजेटवर दिसतो. महिन्याच्या सुरुवातीला केलेली किराण्याची खरेदी महिनाअखेरीस पुरेलच याची खात्री राहिलेली नाही. भाजीपाल्याचे दर, डाळी, तांदूळ, खाद्यतेल, दूध, फळे या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या की घरखर्चाचे गणित बिघडते. सामान्य कुटुंबाला चैनीच्या वस्तूंचा खर्च कमी करता येतो; पण अन्न, औषधे आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजा टाळता येत नाहीत. त्यामुळे खर्च भागवण्यासाठी कधी बचतीला हात घालावा लागतो, तर कधी कर्ज घ्यावे लागते. याचा परिणाम मुलांच्या आहारावर, शिक्षणावर आणि कुटुंबाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. म्हणजेच महागाई ही केवळ आर्थिक समस्या नसून पुढच्या पिढीच्या भविष्यावर परिणाम करणारी समस्या आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित नसतो. मालवाहतुकीचा खर्च वाढला की त्याचा परिणाम भाजीपाला, फळे, किराणा, बांधकाम साहित्य आणि इतर वस्तूंच्या किमतींवर होतो. वाहतूक खर्च, साठवणूक, वितरण आणि बाजारपेठेतील मध्यस्थांची भूमिका या सर्वांचा अंतिम किमतीवर परिणाम होतो. महागाई वाढण्यामागे एकच कारण नसते. अनेक घटक एकत्रितपणे काम करतात. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होतो. उत्पादन घटले की बाजारात पुरवठा कमी होऊन किमती वाढतात. काही वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे, साठेबाजी आणि अनावश्यक मध्यस्थांची साखळी यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतात. इंधनाच्या किमती, वाहतूक खर्च आणि वितरण व्यवस्थेतील खर्च यांचा वस्तूंच्या अंतिम किमतीवर परिणाम होतो. युद्धजन्य परिस्थिती, जागतिक बाजारातील तेलाच्या किमती, आयात-निर्यात निर्बंध आणि रुपयाच्या विनिमय मूल्यातील बदल यांचाही परिणाम देशांतर्गत बाजारावर होतो. एखाद्या वस्तूची मागणी वाढली आणि त्या तुलनेत पुरवठा वाढला नाही, तर तिची किंमत वाढते.

महागाईचा सर्वाधिक विचार करायला लावणारा परिणाम मध्यमवर्गावर होतो. कारण या वर्गाचे उत्पन्न मर्यादित असते; परंतु त्याच्या जबाबदाऱ्या मोठ्या असतात. घराचे कर्ज, वाहनाचे कर्ज, मुलांचे शैक्षणिक शुल्क, वीजबिल, विम्याचे हप्ते, औषधोपचार आणि सामाजिक जबाबदाऱ्या अशा अनेक खर्चांची पूर्तता करावी लागते. सरकारी किंवा खासगी नोकरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दरवर्षी वाढेलच असे नाही. पगारवाढ झाली तरी महागाईचा वेग त्यापेक्षा अधिक असेल, तर प्रत्यक्ष क्रयशक्ती कमी होते. निवृत्त व्यक्तींची परिस्थिती तर अधिक कठीण असते. त्यांचे उत्पन्न ठरावीक असते; परंतु औषधोपचार आणि दैनंदिन गरजांचा खर्च वाढत राहतो. म्हणूनच महागाईचा विचार करताना केवळ सरासरी उत्पन्नवाढ किंवा राष्ट्रीय विकासदर पाहून चालणार नाही. सामान्य माणसाच्या हातात प्रत्यक्ष किती पैसा उरतो, हेही तपासले पाहिजे. महागाईवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा या सर्वांची आहे. रिझर्व्ह बँक व्याजदरांच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. परंतु केवळ व्याजदर वाढवून अन्नधान्याचा पुरवठा वाढत नाही किंवा भाजीपाल्याच्या किमती कमी होत नाहीत. त्यासाठी सरकारने काही ठोस उपाय करणे आवश्यक आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाचा आणि पुरवठ्याचा नियमित आढावा घेणे, साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढीवर कठोर कारवाई करणे, शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ आणि रास्त दर मिळवून देणे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून गरजूंपर्यंत धान्य पोहोचवणे, इंधन आणि वाहतूक खर्चाचा वस्तूंच्या किमतींवर होणारा परिणाम तपासणे हे आवश्यक आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आरोग्य, शिक्षण आणि अन्नसुरक्षेच्या सुविधा मजबूत करणे अशी काही ठोस पावले उचलावी लागतील. एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न वाढले, पण त्याच वेळी अन्न, शिक्षण, आरोग्य आणि घरखर्च यांचा खर्च अधिक वाढला, तर त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असे म्हणता येईल का? हा खरा प्रश्न आहे.


- गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४