वास्को : येथील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या राघवेंद्र अपार्टमेंटची आमदार कृष्णा साळकर यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. इमारतीची सद्यस्थिती आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन ही वास्तू पाडण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. (Vasco dangerous Raghavendra apartment demolition moves accelerate) इमारत रिकामी करून पाडण्याबाबत संबंधितांना नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत.
या पाहणीदरम्यान आमदार साळकर यांनी इमारतीतील रहिवाशांशी संवाद साधला. धोकादायक इमारतीत वास्तव्यास राहणे त्यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, काही कुटुंबे इमारत सोडण्यास तयार नसल्याने साळकर यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
राघवेंद्र अपार्टमेंट पाडल्यानंतर इमारतीच्या मालकांनी बिल्डरच्या सहकार्याने नव्याने बांधकाम करावे, अशी योजना असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले. रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि संबंधित घटकांमध्ये समन्वय साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी इमारत रिकामी करून पाडण्याची प्रक्रिया पुढे नेण्यावर भर दिला जात आहे.


