‘लगान’साठी आमिर खानला राजी करण्यास लागले एक वर्ष : आशुतोष गोवारीकर

लगान’ चित्रपट पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा होता. या चित्रपटाबाबत मी आमिर खानसोबत चर्चा केली होती. मात्र त्याला चित्रपटाची कथा आवडली नाही. त्याने भुवनचे पात्र करण्यास नकार दिला. यानंतर मला आमिरला या पात्रासाठी अभिनय करण्यास राजी करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागल्याचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले.

Story: पिनाक कल्लोळी । गोवन वार्ता |
15 mins ago
‘लगान’साठी आमिर खानला राजी करण्यास लागले एक वर्ष : आशुतोष गोवारीकर

पणजी : लगान’ चित्रपट पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा होता. या चित्रपटाबाबत मी आमिर खानसोबत चर्चा केली होती. मात्र त्याला चित्रपटाची कथा आवडली नाही. त्याने भुवनचे पात्र करण्यास नकार दिला. यानंतर मला आमिरला या पात्रासाठी अभिनय करण्यास राजी करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागल्याचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले.

शुक्रवारी इफ्फीच्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी दिग्दर्शक मधुर भांडारकर, दिग्दर्शक फरहान अख्तर उपस्थित होते. ‘लगान’, ‘चांदनी बार’ आणि ‘दिल चाहता है’ चित्रपटांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी या तिघांशी संवाद साधला.

गोवारीकर यांनी सांगितले की, आमिर खानला पहिल्यांदा ‘लगान’ची कथा सांगितल्यावर त्यांचे मत नकारात्मक होते. धोतर घातलेला नायक इंग्रजांच्या संघाला क्रिकेटमध्ये हरवतो हे लोकांना पटणार नाही असे त्याचे मत बनले. यानंतर मी या विषयाचा सखोल अभ्यास केला. इतिहास तज्ञांशी चर्चा केली. पूर्ण संशोधन करून ‘लगान’ची कथा, पटकथा सविस्तरपणे लिहून काढली. यानंतर मी पुन्हा आमिर खानला भेटलो.  यावेळी पण आमिरने मला नकार दिला. मात्र मी त्याला तुझ्या आयुष्यातील थोडा वेळ मला दे अशी विनंती केली. यानंतर आम्ही जवळपास तीन तास लगान वर चर्चा केली. यानंतर तो चित्रपटात काम करण्यास तयार झाला.

मधुर भांडारकर यांनी सांगितले की, ‘चांदनी बार’ असो किंवा ‘फॅशन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ असो मला काही वेळेस नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. तुमचे चित्रपट केवळ समस्या मांडतात, त्यावर उत्तर देत नाहीत किंवा चित्रपट डार्क आहेत अशी टीका झाली. मात्र मी माझ्या चित्रपटातून ज्या गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवल्या जात नाहीत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने मी समाजाला आरसा दाखवला आहे. चित्रपट आर्थिक दृष्ट्या यशस्वी नसले तरी रसिकांना ते आवडले. आणि माझ्यासाठी केवळ प्रेक्षक महत्वाचे आहेत.

यासाठी ‘दिल चाहता है’ची निर्मिती

फरहान अख्तर म्हणाले की, ७० ते ९० च्या दशकातील चित्रपटात मैत्रीचे संबंध बनावट पद्धतीने दाखवण्यात आले. मैत्री खोटी किंवा आदर्शवादी दाखवण्यात आली. मला खऱ्या आयुष्यात मैत्री कशी असते हे दाखवायचे होते. यासाठी मी ‘दिल चाहता है’ची निर्मिती केली.

हेही वाचा
सर्व पहा