सत्तरीत अवकाळी पाऊस; सुपारीला फटका

वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर पाऊस; वाळत घातलेली सुपारी भिजली


57 mins ago
सत्तरीत अवकाळी पाऊस; सुपारीला फटका

अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली सुपारी भिजली.
गोवन वार्ता प्रतिनिधी
वाळपई
सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, या पावसाचा फटका सुपारी उत्पादकांना बसला. वाळत घातलेली सुपारी भिजल्याने उत्पादकांचे नुकसान झाले.
काही दिवसांपासून तालुक्यात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. शुक्रवारी अचानक हवामानात बदल होऊन पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या दरम्यान ढग दाटून आले. विजांचा कडकडाट, गडगडाट सुरू झाला. वादळी वाऱ्याचा जोर वाढला आणि पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पावसाची सर सुरू होती.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. शेती आणि बागायतीवर अवलंबून असलेल्या उत्पादकांसाठी हा पाऊस अडचणीचा ठरला. सध्या सुपारी काढणीचे काम सुरू आहे. अनेक बागायतदारांनी काढलेली सुपारी वाळविण्यासाठी मोकळ्या जागेत पसरून ठेवली आहे. सुपारी व्यवस्थित वाळण्यासाठी सलग काही दिवस ऊन आवश्यक असते. अशा परिस्थितीत अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे वाळत घातलेली सुपारी भिजली. त्यामुळे सुपारी उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा