महिला आरक्षणासह डिलिमिटेशन विधेयकांसाठी केंद्र सरकारची कसोटी

३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन; इतर पक्षांचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न : महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. ३० नोव्हेंबरला लोकसभेचे तर २ डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहेत. या अधिवेशनात महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
महिला आरक्षणासह डिलिमिटेशन विधेयकांसाठी केंद्र सरकारची कसोटी

नवी दिल्ली : महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. ३० नोव्हेंबरला लोकसभेचे तर २ डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहेत. या अधिवेशनात महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता आहे.

मात्र, हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले घटनादुरुस्तीचे विशेष बहुमत मिळवणे हे केंद्र सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी सत्ताधारी एनडीएकडून विविध पक्षांचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. २०२७च्या जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेची प्रतीक्षा न करता २०११ च्या जनगणनेच्या आधारे पुनर्रचना करण्याचा पर्याय सरकारकडून विचाराधीन असल्याचे सांगितले जाते.

दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होऊ नये, यासाठी १९७१ च्या जनगणनेनुसार राज्यांमधील जागांचे प्रमाण कायम ठेवण्याचाही पर्याय चर्चेत आहे.

लोकसभेतील घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी किमान ३६० खासदारांचे समर्थन आवश्यक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजप आणि मित्रपक्षांचे मिळून सुमारे ३२१ खासदारांचे संख्याबळ आहे. वायएसआर काँग्रेसचे चार खासदार आणि एका अपक्षाचा पाठिंबा गृहीत धरल्यास हा आकडा ३२६ वर पोहोचतो. द्रमुकचे २२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ खासदार यांचे समर्थन मिळाल्यास संभाव्य संख्याबळ ३५६ पर्यंत जाऊ शकते. तरीही आवश्यक बहुमतासाठी आणखी चार मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे सरकारची राजकीय गणिते महत्त्वाची ठरणार आहेत.

अनेक विरोधी पक्षांचा विरोध

या विधेयकावर विरोधकांमध्ये एकमत नसले तरी मतदारसंघ पुनर्रचनेला अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने सध्याच्या ५४३ लोकसभा जागांमध्येच महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पक्षाचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शरद पवार गटाच्या खासदारांना व्हिप

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. तीन ओळींच्या व्हिप मध्ये ३० नोव्हेंबर ते शुक्रवार ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा