पणजी : गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अमायरा अमर धुमटकर हिने छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या ‘योनेक्स-सनराईज ५ व्या मिनी (११ वर्षांखालील) राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत’ मुलींच्या एकेरीचे सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात अमायराने कर्नाटकच्या ज्योत्स्ना विनोद हिचा १५-११, १५-९ असा सरळ गेममध्ये पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. या विजयासह कोणत्याही एकेरी गटात राष्ट्रीय विजेती ठरणारी ती गोव्याची पहिलीच खेळाडू ठरली आहे.
रायपूर येथे २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली. देशात प्रथम मानांकित असलेल्या १० वर्षीय अमायराने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत अंतिम सामन्यात वर्चस्व गाजवले. गेल्या वर्षी गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते; मात्र यंदा तिने आपल्या कामगिरीत सुधारणा करत कांस्यपदकाचे रूपांतर ऐतिहासिक सुवर्णपदकात केले.
अमायरासाठी हा महिना अत्यंत संस्मरणीय ठरला आहे. या राष्ट्रीय जेतेपदापूर्वी तिने मुंबई येथे २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या ‘योनेक्स-सनराईज अखिल भारतीय सब-ज्युनियर मानांकन स्पर्धेत’ तेलंगणाच्या सायना शर्मा हिच्या साथीत १३ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे विजेतेपदही पटकावले होते.
ऑलिम्पिक स्वप्नासाठी प्रायोजकांनी पुढे यावे : मनोज पाटील
अमायराच्या या ऐतिहासिक यशाबद्दल गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी तिचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “अमायरा ही एक असामान्य प्रतिभावान खेळाडू आहे. अवघ्या १० व्या वर्षी तिने आपल्या वयाच्या खेळाडूंकडून अपेक्षित असलेल्या मेहनतीपेक्षाही अधिक परिश्रम घेतले आहेत. या स्तरावर खेळण्यासाठी प्रचंड समर्पणाची गरज असते आणि तिला ही संधी मिळावी म्हणून तिच्या कुटुंबाने मोठा त्याग केला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिचे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र आणि इतर प्रायोजकांनी पुढे येऊन तिला पाठबळ द्यावे, असे आम्ही आवाहन करतो.


