कोलवाळ पोलिसांकडून अजून चार कैद्यांना अटक

कैदी विकट भगतवरील खुनी हल्ला प्रकरणी कारवाई

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
58 mins ago
कोलवाळ पोलिसांकडून अजून चार कैद्यांना अटक

म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैदी विकट भगत याच्यावरील खुनी हल्ला प्रकरणी पोलिसांनी संशयितांपैकी अजून चार जणांना अटक केली आहे. आकाश मुदराज, टारझन पार्सेकर, सागर पाटील व झाकिऊल्ला खाझी या कैद्यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश असून आतापर्यंत या प्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली.

संशयित आरोपी कैदी टारझन पार्सेकर व सागर पाटील यांची म्हापसा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर, आकाश मुदराज आणि झाकिऊल्ला खाझी यांना प्रत्येकी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कोलवाळ पोलिसांनी यापूर्वी २१ नोव्हेंबर रोजी बाबू बालेकर, रामकृष्ण बालेकर व मंथन च्यारी या तिघांना या प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, याप्रकरणातील इतर संशयित आरोपींमधील कैदी पीटर, व्यंकटेश स्वामी व अफलान यांनाही अटक करण्यात येणार आहे.

दरम्यान, ही खुनी हल्ल्याची घटना बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४२ च्या सुमारास कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात घडली होती. पूर्ववैमनस्यातून आरोपी कैद्यांच्या टोळक्याने कैदी विकत भगत याच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता.

आरोपींनी कारागृहाच्या अतिसुरक्षित विभागाच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेले कारागृह वॉर्डन जयेश गावकर यांना ओलीस धरले आणि प्रतिबंधित क्षेत्रात बळजबरीने प्रवेश करीत भगतला जबर मारहाण केली होती. न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीनंतर एक कैदी अतिसुरक्षित विभागात जात होता. याचा फायदा घेत कैद्यांनी विकट भगतवर हल्ला चढवत आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला होता.

या प्रकरणी कारागृहाचे उपअधीक्षक अनिल गावकर यांच्या तक्रारीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी आकाश मुदराज, टारझन पार्सेकर, सागर पाटील, बाबू बालेकर, झाकिऊल्ला खाझी, रामकृष्ण बालेकर, पीटर, व्यंकटेश स्वामी, अफलान, मंथन च्यारी यांच्यासह इतर कैद्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ६१(२), १०९(१) अन्वये गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर हे पुढील तपास करत आहेत.

आणखी तीन कैदी पोलिसांच्या रडारवर

या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अन्य तीन कैद्यांनाही अटक केली जाणार आहे. पीटर, व्यंकटेश स्वामी आणि अफलान अशी या संशयितांची नावे आहेत. या तिघांची चौकशी करून हल्ल्यातील त्यांचा सहभाग निश्चित केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. 

हेही वाचा
सर्व पहा