राज्यात आतापर्यंत वाहन अपघातात २५१ जणांचा मृत्यू

गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्यू, वाहन अपघातांत मोठी वाढ

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
27th November, 11:50 pm
राज्यात आतापर्यंत वाहन अपघातात २५१ जणांचा मृत्यू

म्हापसा : राज्यात प्राणघातक आणि गंभीर रस्ते अपघातांचे सत्र सुरूच आहे. हल्लीच साकोर्डा येथे झालेल्या अपघातात दोघा शाळकरी मुलींना आपला प्राण गमवावा लागला. यंदा आतापर्यंत वाहन अपघातात २५१ लोकांचा मृत्यू झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी जवळपास ८.१८ टक्के तर अपघातांची टक्केवारी १७.३६ टक्के जास्त आहे.

यंदा १ जानेवारी ते २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत २,४४५ वाहन अपघात पोलीस खात्याकडे नोंद झाले आहेत. त्यात २५१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात १७.३७ टक्के (३६२) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, अपघाती मृत्यूची संख्या ८.१८ टक्के (१९) पेक्षा जास्त आहे. गंभीर जखमी आणि किरकोळ जखमीत वाढ झाली आहे. राज्यात दिवसाला ७ अपघात आणि ३१ तासांत एकाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये वरील कालावधीत एकूण २०८३ अपघातांची नोंद झाली होती. तर यंदा २०२६ मध्ये २,४४५ अपघात घडले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण अपघातांमध्ये ३६२ वाढ झाली आहे. ही टक्केवारी १७.३७ एवढी आहे. तर अपघाती मृत्यूत गेल्या वर्षीच्या २३२ तुलनेत यंदा २५१ मृत्यू झाले असून त्याची टक्केवारी ८.१८ टक्के आहे.

मृतांसह गंभीर आणि किरकोळ अपघातांच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाली आहे. यंदा ३३० दिवसांत २,४४५ अपघात झाले असून त्यातील २३९ अपघात हे प्राणघातक आहेत. २४२ अपघातांत ३०२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तर ५५८ किरकोळ अपघातांत ८५८ वाहनस्वारांना किरकोळ दुखापत झाली. शिवाय विनाजखमी १४०६ अपघात घडले असून त्यामध्ये वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात वरील कालावधीत २०२५ मध्ये २,०८३ अपघात घडले होते. त्यातील २२४ प्राणघातक अपघातांत २३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९८ गंभीर अपघातांत २४७ जणांना गंभीर, तर ३९१ अपघातांत ६७९ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. तसेच विनाजखमी १,२७० अपघातांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३६२ च्या संख्येने अपघात वाढ झाली असून अपघाती मृत्यूमध्ये १९ जणांची भर पडली आहे. यंदा सुरूवातीच्या आठ नऊ महिन्यांत वाहन अपघातांची टक्केवारी कमी होती. मात्र, मागील दोन महिन्यांत सर्वच वाहन अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्ता सुरक्षा व्यवस्था आणि जलद आपत्कालीन वैद्यकीय मदत असूनही वाहन अपघातात प्राण गमवण्याचे प्रमाण अधिक असून यामध्ये युवा वर्गाची संख्या जास्त आहे.

गंभीर व किरकोळ जखमींची संख्याही वाढीव असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगमर्यादा आणि विनाहेल्मेट तसेच सीटबेल्टचा वापर अनेकजण करत नसल्यामुळे अपघातात वाढ होत आहे.


हेही वाचा
सर्व पहा