श्री लक्ष्मीनारायण मंदिर, न्हावेली-साखळी

गावस कुटुंबियांनी न्हावेलीत स्थलांतर केल्यानंतर गाव वसविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. प्रथम आपल्या कुळाची स्थापना केली. कदाचित गावस कुटुंबीय येण्यापूर्वी गावात लक्ष्मीनारायणाचे एकच मंदिर असावे. गावस कुटुंबियांनी गाव वसविल्यावर सातेरी, रवळनाथ व वेताळ देवाची स्थापना करून त्यांची मंदिरे बांधली असावी. तसेच कुणबी वंश व घाडी वंश ही मंदिरे बांधली.


30th November, 06:02 am
श्री लक्ष्मीनारायण मंदिर, न्हावेली-साखळी

न्हावेली हे डिचोली तालुक्यातील निसर्गाचे वरदान लाभलेले एक शेतीप्रधान गाव. गावातील जुने जाणते लोक सांगतात की, नावेलीतील गावस हे सत्तरीतील झर्मे गावाहून स्थलांतरित झाले आहेत. यासंबंधी झर्मे गावातील लोकांशी चौकशी केली असता, झर्मे गावातील लोक हे मान्य करतात. झर्मे गावातील गावस कुटुंबियांची एक शाखा न्हावेलीला स्थलांतरित झाल्याचे ते सांगतात.

झर्मे गावातील प्रत्येक देवाच्या उत्सवात गाऱ्हाणे घालतेवेळी ते न्हावेली गावाचा उल्लेख करतात. पण, हे स्थलांतर केव्हा झाले, याचे पुरावे उपलब्ध नाहीत. प्रथमदर्शनी न्हावेली गावातील गावस हे झर्मे गावातून स्थलांतरित झाले हे, मान्य करायला हरकत नसावी. पण, हे सगळे सांगत असताना एक जाणवते ते हे की, झर्मे गावातील देवस्थान व परंपरा या न्हावेली गावातील देवस्थान व परंपरा याच्याशी मिळत्याजुळत्या नाहीत. झर्मे गावचे ग्रामदैवत सातेरी आहे, तर न्हावेलीचे ग्रामदैवत लक्ष्मीनारायण आहे. गावस हे मराठा ज्ञातीतील. बहुतेक मराठा ज्ञातीतील देवस्थाने ही शैवपंथीय आहेत. आपल्या शेजारील गाव, आमोणे, कुडणे, कोठंबी या गावांतील देवस्थाने पाहिल्यास आपल्या हे लक्षात येते. पण, न्हावेली गावातील मराठा ज्ञातीतील लोकांचे देवस्थान हे वैष्णव पंथीय आहे. बाराजण येथे वास्तव्य करून असलेले ब्राह्मण कुटुंबीय नेहमी सांगतात हा गाव आमचा, ब्राह्मणांचा आहे. नावेली गावात स्थायिक झाल्यावर गावस कुटुंबियांनी आपल्या उत्सव परंपरांबरोबर ब्राह्मणांचे उत्सव परंपरा चालू ठेवल्या. काही काळानंतर ब्राह्मण आणि गावस यांच्यात समझोता झाला आणि त्या समझोत्यानुसार गावाचा बारावा भाग ब्राह्मणांना दिला. त्या भागाला आज ‘बाराजण’ या नावाने संबोधले जाते आणि या बाराजणात मराठे आडनावाच्या ब्राह्मणांची वस्ती आजही आहे. या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. पण, परिस्थितीजन्य पुरावे सापडतात. 

नावेली गावात बहुतेक शैव पंथीय उत्सव साजरे केले जात नाहीत. उदाहरणार्थ न्हावेली गावात नागपंचमी साजरी केली जात नाही. आमोणे व कुडणे गावांत शिमग्याच्या दिवसात ‘गडे’ पडतात. गडे म्हणजे शिवाचे गण. न्हावेली गावात गडे पडत नाही. न्हावेली गावातील शिमगा हा इतर गावांतील शिमग्यापेक्षा निराळा आहे. इथे मांडावर तालगडी सारखा नृत्य प्रकार खेळला जातो. जो वैष्णव पंथाला जवळचा आहे. चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरोघरी गौरीपूजन केले जाते. गौरी ही बहुतेक ब्राह्मण कुटुंबात पूजली जाते. न्हावेली गावात वेगळे असे शिव मंदिर नाही आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावस कुटुंबियांनी न्हावेलीला स्थलांतर केल्यानंतर आपल्या कुळाची स्थापना केली. त्यांच्या शेजारीच ब्राह्मण कुळाचीही मूर्ती आहे. यावरून काय तो अंदाज काढावा.

महाजन आणि सेवेकरी

न्हावेली गावाचा इतिहास किंवा देवस्थानाचा इतिहास लिखित स्वरूपात कुठेही उपलब्ध नाही. माहिती मिळते ती मौखिक स्वरूपाची, एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलेली. त्यामुळे या मौखिक माहितीवर अवलंबून राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. फक्त लिखित स्वरूपात सापडतो तो एकच दस्तावेज म्हणजे देवस्थानाचा ‘बायलॉज’, जो सरकारी दरबारी २६ ऑक्टोबर १९३४ रोजी रजिस्टर झालेला आहे. या बायलॉजप्रमाणे न्हावेली गावच्या कोमुनिदादचे कम्पोनंट असलेले गावस आडनावाचे पुरुष फक्त महाजन असतील. रजिस्टर करतेवेळी या चारही वांगड्यांच्या महाजनांची त्यात नावे दिली आहेत. तसेच भट पुजारी, गुरव पुजारी, कलावंत आणि जल्मी, मडवळ, घाडी व महार हे सेवेकरी असे म्हटले आहे. इतर उत्सव, रितीरिवाज परंपरेने चालत आल्याप्रमाणे होतील, असेही लिहिले आहे.

आकर्षक भव्य मंदिरे

गावस कुटुंबियांनी न्हावेलीस स्थलांतर केल्यावर गाव वसविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. एखादा गाव वसवणुकीसाठी शास्त्रशुद्ध विधी करायचे असतात. ते घाडी, ब्राह्मणांच्या मदतीने केले. प्रथम आपल्या कुळाची स्थापना केली. कदाचित गावस कुटुंबीय येण्यापूर्वी गावात लक्ष्मीनारायणाचे एकच मंदिर असावे. गावस कुटुंबियांनी गाव वसविल्यावर सातेरी, रवळनाथ व वेताळ देवाची स्थापना करून त्यांची मंदिरे बांधली असावी. तसेच कुणबी वंश व घाडी वंश ही मंदिरे बांधली. वेळोवेळी त्यांचे नूतनीकरणही केले असावे. त्याकाळी उत्पन्नाची साधने मर्यादित असूनही जी आकर्षक भव्य मंदिरे बांधली, ती पाहून आश्चर्य वाटते. त्या मंदिरांकडे पाहिले, तर न्हावेली गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध होता, याचा अंदाज बांधता येतो. आर्थिक समृद्धी असल्याशिवाय अशी मंदिरे उभी करणे शक्य नाही. 

दीडशे वर्षांपूर्वी...

पूर्वी गावात लक्ष्मीनारायण देवाची छोटीशी देवळी असावी. कदाचित ती मराठे कुटुंबियांनी बांधलेली असावी. या देवळात असलेली नारायण देवाची मूर्ती ही सोळाव्या शतकातील असावी, असे इतिहास संशोधकांचे मत आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या देवळीच्या जागेवर गावस कुटुंबियांनी प्रशस्त असे देऊळ व सोणयो बांधला. गावकऱ्यांच्या बैठका, सभा या सोणयात होत होत्या. पूर्वी देवळासमोर भव्य असा माडाच्या मल्लांचा (माडाची झावळे) मंडप घातला जायचा. याच मंडपात देवस्थानाची नाटके वगैरे कार्यक्रम चालायचे. 

पाषाणी मंदिर

न्हावेलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री लक्ष्मीनारायण देवाचे नूतन देऊळ संपूर्ण पाषाणाचे आहे. असे देऊळ गावाच्या आजूबाजूच्या कोणत्याही गावात नाही. पाच वर्षे या देवळाचे बांधकाम चालले होते. त्यासाठी देवस्थान समिती आणि ग्रामस्थांनी फार परिश्रम घेतले आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा