मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतला दिलेश; आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

होर्मुझ सामुद्रधुनीतील मिसाईल हल्ल्यांतून बचावलेल्या मुरगावचा खलाशी दिलेश तेली याची सुखरूप घरवापसी झाली. कंपनीच्या मदतीने तो गोव्यात परतला असून, त्याने हल्ल्याचा थरार आणि पुढील करिअरच्या वाटचालीबाबत माहिती दिली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
31 mins ago
मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतला दिलेश; आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

पणजी : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण सागरी मार्गावर, होर्मुझच्या सामुद्रधुनीत एलपीजी वाहक ‘एमटी तारा गॅस’ जहाजावर झालेल्या भीषण मिसाईल हल्ल्यांतून बचावलेला सडा-मुरगाव येथील २४ वर्षीय प्रशिक्षणार्थी अभियंता दिलेश तेली अखेर शुक्रवारी सुखरूप घरी परतला. मृत्यूच्या छायेतून परतलेल्या दिलेशला पाहताच वडील चंद्रकांत आणि आई चारुशीला तेली यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यांच्या अश्रूंमध्ये काळजीपेक्षा मुलाच्या सुरक्षित पुनरागमनाचा दिलासा अधिक होता.

हल्ल्यानंतर ओमान येथे ठेवण्यात आलेल्या दिलेशने शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाचा अनुभव कथन केला. १६ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० ते १०.४५ दरम्यान पहिला मिसाईल हल्ला झाला; वीजपुरवठा गेला आणि धूर पसरला. आपत्कालीन इन्व्हर्टरमुळे सर्वांची सुरक्षितता तपासता आली. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता जहाजाच्या पुढील, मधल्या आणि मागील भागावर तीन हल्ले झाले. त्यावेळी डेकवर असलेल्या दिलेशसमोर धूर आणि अंधाराचे संकट होते. मुख्य अभियंता अरुण मुगिलन यांनी मार्ग दाखवला आणि उष्णतेने लाईफबोट अंशतः वितळल्याने समुद्रात उडी मारण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

या संकटानंतर ओमानमधून २३ भारतीय नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केला. मस्कतमार्गे हैदराबाद आणि तेथून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता दिलेश गोव्यात पोहोचला. दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर मंत्री व आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह अनेकांनी विचारपूस केली. कंपनीने आपत्कालीन पासपोर्ट व कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने परतीची व्यवस्था केली.

समुद्रावरील आवश्यक सेवाकाल पूर्ण झाल्याचे सांगत दिलेशने ‘फोर्थ इंजिनिअर’ पदाच्या पुढील प्रक्रियेचा निर्णय कंपनी घेणार असल्याचे स्पष्ट केले. हरवलेला मोबाइल, लॅपटॉप आणि कागदपत्रांची यादी त्याने कंपनीला दिली असून, भरपाईचे आश्वासन मिळाले आहे.

हेही वाचा
सर्व पहा