गोवन वार्ता न्यूज डेस्क
नवी दिल्ली
संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केंद्र सरकारने देशातील लोकसभा जागांच्या संभाव्य बदलांचा नवीन नकाशा समोर आणला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शनिवारी मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच्या प्रस्तावित जागांची माहिती दिली. या प्रस्तावानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभेच्या जागांमध्ये सारख्याच प्रमाणात ५० टक्के वाढ केली जाईल. यामुळे लोकसभेतील एकूण सदस्यांची संख्या जास्तीत जास्त ८५० पर्यंत जाऊ शकते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर हा नकाशा शेअर करताना मेघवाल यांनी सांगितले की, हा प्रस्ताव भारताच्या संसदीय रचनेला नवा आकार देणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या वाढीनंतर राज्यांमधील जागांचे हे नवीन प्रमाण २०५१ सालापर्यंत कायम राहील.
या प्रस्तावात विषम संख्या असलेल्या राज्यांच्या जागा कशा मोजायच्या, याचा तपशील अद्याप स्पष्ट केलेला नाही. मात्र, मेघवाल यांनी सादर केलेल्या योजनेनुसार विविध राज्यांच्या जागांमध्ये मोठी वाढ होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या जागा ४८ वरून ७२ होतील. तसेच तामिळनाडूच्या जागा ३९ वरून ५९, आंध्र प्रदेशच्या २५ वरून ३८, पंजाबच्या १३ वरून २०, तेलंगणाच्या १७ वरून २६ आणि गोव्याच्या २ वरून ३ करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच इतर राज्यांच्या जागांमध्येही वाढ होणार आहे.
केंद्र सरकारला वाटते की, लोकसभेत ८५० सदस्य असावेत. यासाठी सरकार महिला आरक्षणाचा आधार घेत आहे. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले आहे; त्याची अंमलबजावणी उद्यापासूनही होऊ शकते. मग प्रश्न पडतो की, ८५० चा आकडाच का? याचे उत्तर आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये दडलेले आहे; कारण ८५० जागांच्या माध्यमातून भारतातील निवडणुकीत मोठे बदल घडवून आणले जाऊ शकतात आणि मतदारसंघाचा नकाशा नव्याने आखला जाऊ शकतो.
_ राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते, लोकसभा
राष्ट्रपतींनी केली विधेयक सादर करण्याची शिफारस
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी संविधानाच्या अनुच्छेद ११७(३) अंतर्गत लोकसभेत परिसीमन (दुसरे) विधेयक, २०२६ विचारात घेण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात ते सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या विधेयकाला मंजुरी दिली होती. राष्ट्रपतींच्या शिफारशीनुसार, या विधेयकावर आता संसदेत चर्चा होईल. ते मंजूर करण्यासाठी सरकारला दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताची आवश्यकता असेल. घटनादुरुस्ती विधेयक असल्याने, किमान निम्म्या राज्यांच्या विधानसभेची मंजुरीदेखील आवश्यक असेल.
विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा
तामिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमकेचे लोकसभेतील २२ खासदार या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याने एनडीएला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याच्या प्रयत्नांना मोठी मदत होऊ शकते. आठ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट ही केंद्र सरकारच्या विधेयकांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.


