कांदोळीत बनाना राईडदरम्यान पर्यटकाचा बुडून मृत्यू

जलसफरीवेळी घटना : मेरठच्या यशपाल नंदवानी यांचा गेला जीव

Story: गोवन वार्ता प्रतिनिधी |
28th November, 10:58 pm
कांदोळीत बनाना राईडदरम्यान पर्यटकाचा बुडून मृत्यू

म्हापसा : कांदोळी येथील समुद्रकिनारी बनाना फ्लोटर राईड जलसफरीवेळी पाण्यात पडल्याने यशपाल नंदवानी (५४, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.

ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी ४.१० वा. सुमारास एलरो शॅक रेस्टॉरन्ट समोर घडली. नंदवानी कुटुंबीय गोव्यात पर्यटनासाठी आले होते. शनिवारी दुपारी ते कांदोळी समुद्रकिनारी आले असता त्यांनी बनाना फ्लोटर राईड जलसफर करण्याचा निर्णय केला. त्यानुसार या कुटुंबाने टॉम वॉटरस्पोटर्सद्वारे राबवण्यात येणाऱ्या बनाना राईड जलसफरीचे तिकीट काढले व ते जलसफरीसाठी निघाले. समुद्राच्या पाण्यात जलसफर करून येताना किनाऱ्याजवळ ऑपरेटरने बोट उलटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी यशपाल नंदवानी यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना पोहताही येत नव्हते.

समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक व पर्यटक पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने प्रकृती गंभीर असल्याने यशपाल यांना कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना समुद्राच्या पाण्यामध्ये घडल्याने पणजी किनारी पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली किनारी पोलीस करत आहेत.

दरम्यान, ११ मार्च २०२६ रोजी हणजूण येथील समुद्रकिनारी बनाना फ्लोटर राईड जलसफरीची दुर्घटना घडली होती. यात मध्यप्रदेशची पर्यटक महिला रजनी सुनील इंदोलिया (३६) हिचा मृत्यू झाला होता. या अपघाताला कारणीभूत जॅक वॉटर स्पोर्टसचे मालक डॉम्निक जॅक डिसोझा (हणजूण) व जेटस्की बोट ऑपरेटर शिवाजी लमाणी (३६, रा. हणजूण, मूळ कर्नाटक) यांच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

जीवरक्षकांच्या प्रयत्नांनंतरही पर्यटकाचा मृत्यू

यशपाल नंदवानी यांना पोहता येत नव्हते. बोट उलटी करताना नाकातोंडात पाणी गेल्याने प्रकृती बिघडली. जीवरक्षक व पर्यटक पोलिसांकडून तातडीने मदत करण्यात आली. मात्र, कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा
सर्व पहा