पणजी : फातोर्डा येथे अल्कोमीटर चाचणीदरम्यान वाहतूक पोलिसाने ट्रकचालकाच्या कानशिलात लगावल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर दै. ‘गोवन वार्ता’च्या सोशल मीडिया व्यासपीठावरील ‘चर्चेची वार्ता’ या सदरात वाचकांना ‘तुमचे काय मत आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विविध क्षेत्रांतील वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी पोलिसांना कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली. तर काहींनी घटनेची दुसरी बाजू तपासण्याची गरज व्यक्त केली.
............ 
दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करता येणार नाही. चालक मद्यधुंद होता का, उद्धटपणे किंवा अपमानास्पद भाषा वापरत होता का, हे तपासणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करून सत्य समोर आणावे.
- संजीव पै रायतुरकर
..............
चालकाची चूक असली तरी कायद्याचा मार्ग सोडून हात उचलणे योग्य नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासून खरी परिस्थिती समोर आणावी. सामान्य नागरिक असो वा पोलीस अधिकारी, कायदा सर्वांना समान असावा.
- दीपक देविदास
..............
पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये.
- सत्यजित वागळे
..............
चालकाला दंड ठोठावायला हवा होता.
- प्रदीप परब
..............
कोणालाही कायदा हातात घेता येत नाही. चालकावर अधिक दंडात्मक कारवाई करता आली असती.
- जनार्दन फडते
..............
कोणालाही मारण्याचा अधिकार पोलिसांना नाही. संबंधित पोलिसाला निलंबित केले पाहिजे.
- सुशांत कवळेकर
..............
पोलीस किंवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा अधिकार नाही. तक्रार नोंदवणे, अटक करणे किंवा दंड ठोठावणे असे कायदेशीर पर्याय आहेत. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांना मदत करावी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक सरकारी खात्यात योग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत.
- नंदकुमार आपा भगत
..............
पोलिसांना हात उगारण्याचा अधिकार नाही. संबंधित पोलिसाला निलंबित करावे.
- विनोद पालेकर
.................
नेमके काय घडले, याची आधी चौकशी करावी.
- महेश पेडणेकर
.................
चालक अल्कोमीटर चाचणीस सहकार्य करत नव्हता, त्यामुळे पोलिसांची कृती योग्य आहे.
- मुरारी हरमलकर
..............
गोव्यात दारूची विक्री आणि उत्पादन बंद केले पाहिजे. तसे झाल्यास बाहेरील वाहनचालक दारू पिणार नाहीत. पोलिसांनाही अल्कोमीटर घेऊन उभे राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गुन्हे आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनाही कमी होतील.
- रणजित वायकर
..............
पोलीस किंवा वाहतूक पोलिसांना कायदा हातात घेता येत नाही. त्यासाठी नियम आहेत.
- सोनू खांडेपारकर
..............
यावेळी पोलिसांची कृती योग्य आहे. चालक सहकार्य करत नसल्याने पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागली.
- अर्जुन राणे
..........
चालकाने मद्यपान केले असेल तर त्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस करता येते. मात्र, कानशिलात मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?
- संतोष शेटकर
........... 
पोलिसांनी चालकाला मारहाण करण्याऐवजी त्याचा वाहनचालक परवाना निलंबित करण्याची कारवाई करावी.
- हेमंत सामंत
..............
पोलीस असहाय्य असतील तर कोणीही त्यांना अधिकार दिल्याशिवाय मारू शकणार नाही.
- विनायक महाले
..............
ही कृती चुकीची आहे. वाहतूक पोलीस अधीक्षक संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.
- सर्वेश कांदोळकर
..............
पोलिसांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का?
- पांडुरंग दत्ता मयानाथ
..............
पोलीस प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती पाहून काम करतात.
- राहुल परब
..............
वाहतूक पोलिसाने चालकाला थप्पड मारणे पूर्णपणे चुकीचे आहे. पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. गुन्हेगाराला पकडून न्यायालयासमोर उभे करणे हे त्यांचे काम आहे. शिक्षा देण्याचे काम न्यायालयाचे आहे. अशा प्रकारामुळे चुकीचा पायंडा पडतो.
- उमाकांत शेट्ये
..............
पोलिसांनी कायदा हातात घेणे योग्य नाही. चालकाने नियम मोडले असतील तर दंड, वाहन जप्ती किंवा गुन्हा नोंदवण्यासारखी कायदेशीर कारवाई करता येते. मात्र, रस्त्यावरच कानशिलात लगावणे पोलिसांच्या वर्दीला शोभत नाही. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करावी आणि पोलिसांना संयमाने वागण्याच्या सूचना द्याव्यात.
- राजेंद्र पेडणेकर
..............
वाहतूक पोलिसांनी आपले काम व्यवस्थित करावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी. मात्र, मारहाण करण्याची परवानगी नाही. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून शक्य असल्यास बडतर्फ करावे.
- किरण बेळेकर
..............
दारू पिऊन उद्धटपणे वागल्यास असेच करावे लागते.
- मदन नाईक
..............
पोलिसांना दुसऱ्याच्या कानशिलात मारण्याचा अधिकार कोणी दिला?
- बाळू भट
..............
पोलीस उपनिरीक्षकाची नशा उतरवण्याचा एकच उपाय म्हणजे बडतर्फी. त्याला तातडीने निलंबित करून दिवाणी दावा दाखल करावा.
- वासुदेव गावस
..............
या प्रक्रियेमुळे संबंधित पोलिसाचा राग आणि निराशा अशा प्रकारे बाहेर पडताना दिसते.
- अजय पै
................ 
पुण्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणादरम्यान मद्यपान करताना आढळलेल्या गोवा पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांना परत पाठवण्यात आले होते. त्यांच्यावरही अशीच कठोर कारवाई का झाली नाही?
- चारुदत्त जोग
..............
वाहतूक पोलिसांनी नागरिकांशी कसे वागावे, याबाबतचे नियम पाळले पाहिजेत. नागरिकांना मारहाण किंवा शिवीगाळ करण्याचा अधिकार त्यांना नाही. संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाची चौकशी करून तक्रारीवर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांच्या गणवेशाची प्रतिष्ठा राखणे आणि गोव्यातील रस्त्यांवर नागरिकांना सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
- सागर देशप्रभू


