संगरगाळी येथे विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; नारळ काढताना घडली घटना

खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथे नारळ काढताना लोखंडी पाइपचा उच्चदाब विद्युत तारेला स्पर्श होऊन शालू मस्करेन आणि त्यांच्या पत्नी मीलाग्रीन यांचा विजेच्या धक्क्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
41 mins ago
संगरगाळी येथे विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; नारळ काढताना घडली घटना

बेळगाव : खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथे घराच्या परसातील नारळाच्या झाडावरून नारळ काढताना उच्चदाबाच्या विजेच्या तारेला लोखंडी पाइपचा स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत शालू सावेर मस्करेन (वय ७०) आणि त्यांची पत्नी मीलाग्रीन शालू मस्करेन (वय अंदाजे ६५) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शालू मस्करेन हे आपल्या घराच्या परसातील झाडावरील नारळ लोखंडी पाइपच्या साहाय्याने काढत होते. यावेळी तोल जाऊन त्यांच्या हातातील लोखंडी पाइपचा स्पर्श झाडाजवळून जाणाऱ्या हेस्कॉमच्या ११ हजार व्होल्ट उच्चदाब विजेच्या तारेला झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.

पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून पत्नी मीलाग्रीन यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही तीव्र धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संगरगाळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक (पीआय) एल. एच. गोवंडी व उपनिरीक्षक (पीएसआय) निरंजन स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असून, उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. एकाच कुटुंबातील दोघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा