म्हापसा :च्यारीवाडा, मयडे येथे लागलेल्या आगीत महेश च्यारी यांच्या तीन दुचाकी जळून भस्मसात झाल्या, तर तीन दुचाकींसह घराचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अंदाजे ५ लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
ही दुर्घटना शनिवारी २८ रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. च्यारी यांच्या घरासमोर सहा दुचाकी पार्क केल्या होत्या. या दुचाकींना अचानक आग लागली.
आगीमुळे दुचाकीचा मोठ्याने आवाज येऊ लागला. त्यामुळे च्यारी कुटुंबीय झोपेतून जागे झाले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. तेव्हा दुचाकींना आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी धावपळ करत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणात येत नसल्याचे पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत तीन दुचाकी पूर्णतः जळाल्या होत्या, तर तीन दुचाकींना वाचवण्यात यश आले. या दुचाकींचे देखील आगीची जळ बसल्यामुळे नुकसान झाले आहे. शिवाय या जुन्या घराच्या व्हराड्यांचे लाकडी फर्निचर, कौलारू छताचे वासे व अन्य मालमत्तेची मोठी हानी झाली.


