रत्नागिरी : तालुक्यातील खेडशी-चांदसूर्या येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याला वनविभागाने वेळीच धाव घेत सुरक्षितरीत्या जीवदान दिले. मलुष्टे यांच्या आंबा बागेसमोरील रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर २७ नोव्हेंबर रोजी हा बिबट्या आढळून आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारांसाठी त्याला पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना करण्यात आले.
हातखंबा येथील निरंजन जठार यांनी बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला दूरध्वनीद्वारे दिली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक रेस्क्यू साहित्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान बिबट्या जखमी असल्याचे दिसून आले. काही वेळाने तो लंगडत आणि अडखळत पुढे जात असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे त्याला पकडण्याची मोहीम आव्हानात्मक आणि धोकादायक ठरण्याची शक्यता होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर रत्नागिरीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने डार्ट गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला अत्यंत काळजीपूर्वक पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली. अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्याला पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
या बचाव मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, पशुवैद्यकीय अधिकारी स्वरूप काळे, वनपाल सागर गोसावी, वनपाल रत्नराज गायकवाड, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, शर्वरी कदम, विराज संसारे तसेच महेश धोत्रे आणि ईशान खानोलकर (आरआरटी) यांनी सहभाग घेतला.
विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. दरम्यान, वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास किंवा वन्यप्राण्यांशी संबंधित कोणतीही घटना घडल्यास नागरिकांनी स्वतःहून हस्तक्षेप करू नये. अशा वेळी वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी वनविभागाने केले आहे.


