नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असलेल्या एका संशयिताला अटक केली आहे. सोशल मीडियावरील त्याच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. गुजरातमध्ये जैशशी संबंधित संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर दिल्लीतील ही कारवाई झाल्याने सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयितालाही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संघटनेत भरती करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी त्याच्या ऑनलाईन हालचालींचे निरीक्षण केले होते. त्यानंतर चौकशी करून काही दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली.
गुजरातमधील अटकेशी संबंध तपासणार
दरम्यान, गुजरात एटीएसने २७ नोव्हेंबर रोजी वडोदरा जिल्ह्यातील जरोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका संशयिताला अटक केली होती. गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानकाजवळ नाकाबंदी करून एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातून एके-४७ रायफल आणि २३ काडतुसे जप्त करण्यात आली होती. या कारवाईत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते.
प्राथमिक तपासात त्याचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. आता दिल्लीमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयिताचे गुजरातमधील संशयित आरोपीशी काही संबंध आहेत का, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. दोन्ही प्रकरणांमागे एकच नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
सोशल मीडियावरील संपर्कांची कसून चौकशी
दिल्ली पोलिसांची विशेष शाखा अटक केलेल्या संशयिताच्या सोशल मीडिया संपर्कांची, ऑनलाईन हालचालींची आणि संभाव्य भरती प्रक्रियेची माहिती गोळा करीत आहे. त्याच्या माध्यमातून अन्य तरुणांनाही दहशतवादी संघटनेत सामील करण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना दहशतवादी संघटनांच्या जाळ्यात ओढण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


