पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उंबरठा जवळ येत असतानाच, मराठी साहित्यविश्वाची कमान सांभाळणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) अंगणात राजकीय सत्तासंघर्षाचा मोठा भडका उडाला आहे. संस्थेच्या दीर्घ इतिहासात प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव येण्याची ही अभूतपूर्व घटना ठरली असून, या घडामोडीने साहित्यिक वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य वाचकांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
२८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला. या सत्तांतरामुळे परिषदेच्या अध्यक्षपदी सुनील महाजन, कोषाध्यक्षपदी उन्मेष गायधनी आणि प्रमुख कार्यवाहपदी राजन लाखे यांची निवड करण्यात आली आहे.
एखाद्या साहित्य संस्थेत चालणारा हा सत्तासंघर्ष वरकरणी प्रशासकीय वाटत असला, तरी त्यामागे अधिकार, संवाद आणि कारभारातील पारदर्शकतेचे गुंतागुंतीचे पदर दडलेले आहेत. २७ ऑक्टोबरच्या बैठकीत स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधींसह २१ सदस्यांनी स्वाक्षऱ्या करत पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
कार्यकारी मंडळाशी संवादाचा अभाव, अधिकारांमधील हस्तक्षेप, आर्थिक व्यवहारांतील अपारदर्शकता आणि नांदी संमेलनांच्या आयोजनातील अनियमितता या तक्रारींनी असंतोषाला खतपाणी घातले. साहित्यिक संस्थांमध्येही आता आधुनिक संस्थात्मक शिस्त, जबाबदारी आणि लोकशाही प्रक्रियेचा आग्रह तीव्र होत असल्याचे यातून स्पष्ट होते.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे या संपूर्ण घडामोडीला राजकीय व प्रशासकीय कंगोरेही लाभले आहेत. अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या शंभराव्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा नेतृत्वबदल साहित्य क्षेत्रासाठी निर्णायक वळण मानला जात आहे. केवळ पदांची अदलाबदल न राहता, संमेलनाचे सुयोग्य आयोजन आणि साहित्यिक मूल्यांची जपणूक ही नव्या पदाधिकाऱ्यांसमोरील खरी कसोटी असेल. १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पुढील दिशा स्पष्ट होईल.


